बारामती नगरपालिका उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची निवड तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या जाहीर
बारामतीतील स्थानिक राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

बारामती नगरपालिका उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची निवड तसेच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या जाहीर
बारामतीतील स्थानिक राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपालिकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या असून उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे बारामतीतील स्थानिक राजकारणात नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत श्वेता योगेश नाळे यांच्या नावावर सर्व सदस्यांनी शिक्कामोर्तब केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन आणि स्थानिक प्रशासनात समन्वय राखण्यावर भर देत ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाळे या यापूर्वीही सामाजिक व विविध उपक्रमांमध्ये सक्रिय राहिल्या असून त्यांच्या अनुभवाचा लाभ नागरी समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते तसेच विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
निवडीनंतर श्वेता नाळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिकांचे आभार मानले. उपनगरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख कारभार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, बारामती नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठीही अखेर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सोमनाथ गाजाकस, अमोल कावळे, राहुल वाघोलीकर आणि गणेश जोजारे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. या नियुक्त्यांमुळे बारामतीच्या स्थानिक राजकारणात नव्या चर्चा आणि अपेक्षांना उधाण आले आहे.






