बारामतीतील जनशक्ती कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ संपन्न
पत्रकार बांधव, संघटनेतील महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते

बारामतीतील जनशक्ती कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार समारंभ संपन्न
पत्रकार बांधव, संघटनेतील महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेमधील कंत्राटी कामगार, नगरसेवक-नगरसेविका तसेच पत्रकार बांधवांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. हा मेळावा जनशक्ती कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात बोलताना कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष तसेच नगराध्यक्ष यांनी कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.कंत्राटी कामगारांचे वेतन, पीएफ, कामाचे ठराविक वेळापत्रक यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर नगरपरिषद स्तरावर योग्य निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, नवनाथ बल्लाळ, आरती शेंडगे, तसेच पत्रकार बांधव, संघटनेतील महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना गौरव अहिवळे यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर आपले परखड व स्पष्ट मत मांडत प्रशासनाने कामगारांच्या हक्कांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी केली.
यावेळी नगरसेविका आरती शेंडगे यांनी कंत्राटी महिला कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पुढील काळात ठामपणे आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. तर नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी देखील कंत्राटी कामगारांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे सांगत कामगारांना दिलासा दिला.
नगराध्यक्ष सचिन सातव यांनी कंत्राटी कामगारांच्या पगार, पीएफ आणि कामाच्या वेळांबाबत सविस्तर खुलासा करत कामगारांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले.
या सर्व वक्तव्यांमुळे व आश्वासनांमुळे कंत्राटी कामगारांमध्ये नवचैतन्य व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळेल,अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी सर्व नगरसेवक जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






