स्थानिक

बारामती नगरपरिषदेच्या गणेश मार्केट पार्किंगमध्ये मनमानी कारभार; लाखो रुपयांची उधळपट्टी

शिस्त किंवा व्यवस्थापन कुठेही प्रभावीपणे राबवले जात नसल्याचे चित्र आहे

बारामती नगरपरिषदेच्या गणेश मार्केट पार्किंगमध्ये मनमानी कारभार; लाखो रुपयांची उधळपट्टी

शिस्त किंवा व्यवस्थापन कुठेही प्रभावीपणे राबवले जात नसल्याचे चित्र आहे

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या गणेश मार्केट परिसरातील पार्किंग व्यवस्थेबाबत गंभीर अनियमितता समोर येत आहे. या पार्किंग जागेचा मूळ उद्देश बाजारात येणाऱ्या ग्राहक, भाजीपाला विक्रेते व वाहनधारकांसाठी असताना प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी पूर्णपणे वेगळे चित्र दिसून येत आहे.

सध्या या पार्किंग परिसरात काही स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या कायमस्वरूपी खासगी गाड्या लावून ठेवल्याचे आढळून येत आहे.त्यांच्याकडून शुल्क आकारलं जाते का नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे.विशेष म्हणजे अशा अनधिकृतरीत्या उभ्या असलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या सर्व प्रकारात आणखी गंभीर बाब म्हणजे पार्किंग व्यवस्थेसाठी ठेवण्यात आलेल्या सिक्युरिटी कर्मचाऱ्यांवर दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तीन शिफ्टमध्ये सिक्युरिटी नेमण्यात आली असली तरी प्रत्यक्षात पार्किंग नियंत्रण, शिस्त किंवा व्यवस्थापन कुठेही प्रभावीपणे राबवले जात नसल्याचे चित्र आहे. त्या ठिकाणी कोणताही नागरिक पार्किंग मध्ये गाडी लावण्यासाठी जात नाही त्यामुळे सिक्युरिटी यांचा पगारावर उधळपट्टी केली जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

वाहनधारकांना योग्य ठिकाणी गाड्या लावण्यासाठी मार्गदर्शन करणे, अनधिकृत पार्किंग हटवणे यासारखी कामे होत नसल्याने सिक्युरिटी नेमणुकीचा उद्देशच प्रश्नांकित होत आहे.

याशिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली आहे. दुर्गंधी, दारूच्या रिकाम्या बाटल्या, तसेच लघवीसाठी वापरलेली जागा दिसून येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजारात येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक व व्यापाऱ्यांना या अस्वच्छतेमुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नगरपरिषदेकडून या संपूर्ण प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. लाखो रुपयांचा खर्च करूनही जर पार्किंग व्यवस्था कोलमडलेली असेल, तर हा सार्वजनिक पैशाचा अपव्यय असल्याचे स्पष्ट होते. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व पार्किंग व्यवस्था सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी बारामतीतील नागरिकांकडून होत आहे.

Back to top button