शिस्त,संस्कार आणि शिक्षकांचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा माझ्या मुलांना शिक्षा करा
लहान वयात ज्या साच्यात घडवली जातात, तशीच ती आयुष्यभर राहतात.

शिस्त,संस्कार आणि शिक्षकांचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा माझ्या मुलांना शिक्षा करा
लहान वयात ज्या साच्यात घडवली जातात, तशीच ती आयुष्यभर राहतात.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांवर शारीरिक किंवा मानसिक शिक्षा न करण्याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली असतानाच, बारामती तालुक्यातील सावळ येथील एका कुटुंबाने शिक्षण व्यवस्थेला बळ देणारा, जबाबदारीची जाणीव करून देणारा आणि समाजाला विचार करायला लावणारा एक प्रेरणादायी निर्णय घेतला आहे.
ज्ञानसागर गुरुकुल, सावळ येथील इयत्ता सातवीत शिकणाऱ्या वैष्णवी संतोष मासाळ हिचे वडील संतोष दत्तात्रेय मासाळ यांनी शाळा प्रशासनाला लेखी स्वरूपात एक संमतीपत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिस्त, संस्कार आणि शिक्षकांचा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे.
शासन निर्णयांचा आदर राखत असतानाच, भविष्यात मुलीकडून शिस्तभंग झाल्यास शिक्षकांनी योग्य ती शिस्तीची कारवाई करावी, यास त्यांनी लेखी संमती दिली आहे.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया आणि ‘रिल्स’च्या आहारी गेलेली पिढी योग्य वळणावर आणणे हे मोठे आव्हान बनले आहे. यावर बोलताना संतोष मासाळ म्हणतात, “मुलं ही मातीसारखी असतात. लहान वयात ज्या साच्यात घडवली जातात, तशीच ती आयुष्यभर राहतात. शिक्षक हे समाजाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या हातातील शिस्त ही क्रूरता नसून संस्कारांची शिदोरी आहे.”
आज जिथे छोट्याशा कारणावरूनही पालक आणि शिक्षकांमध्ये संघर्ष होतो, तिथे मासाळ कुटुंबाने दाखवलेली विश्वासाची भावना, जबाबदारीची जाणीव आणि शिक्षणसंस्थांवरील आदरभावना खरोखरच प्रेरणादायी आहे. हा निर्णय केवळ एका कुटुंबाचा नसून, तो संपूर्ण समाजाला संदेश देतो की, हक्कांबरोबर कर्तव्यांची जाणीव, स्वातंत्र्याबरोबर शिस्त, आणि प्रेमाबरोबर संस्कार असतील तरच उद्याचा नागरिक सुसंस्कृत घडेल. खऱ्या अर्थाने हे संमतीपत्र नव्हे, तर शिक्षण व्यवस्थेसमोर ठेवलेला विश्वासाचा, संस्कारांचा आणि जबाबदारीचा दीपस्तंभ आहे.
खरंतर फक्त मासाळच नव्हे तर अनेक पालक म्हणतात की, मुलांना शिक्षा करू नये अशी कोणी मागणी केली होती? कोणत्या पालकांनी मागणी केली होती? मुळात सामान्य लोकांना शिक्षण महाग करण्याचा जो सरकारी धोरणाचा छुपा अजेंडा आहे. त्यामुळेच अगोदर पालक मानसिक धक्क्यात गेले आणि त्यानंतर मुलांना मारायचीच नाही हा कोणीतरी जावईशोध लावत मुलं बिघडवून टाकली! पूर्वीची पिढी आज शिस्तप्रिय आहे, कारण पूर्वीच्या काळात शिक्षकांनी ती शिस्तीची घडी बसवली होती. आज शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवादही संपला आहे आणि शिक्षणाचे व्रतदेखील! याला कारण अशीच सरकारी सुपीक डोक्यातून आलेली चुकीची धोरणे कारणीभूत आहेत!






