किरण इंगळे यांची बारामती शहर अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती पक्षात नवचैतन्य, राजकीय वर्तुळात चर्चा
राजकारणासोबतच त्या समाजकार्यातही तितक्याच सक्रिय होत्या.

किरण इंगळे यांची बारामती शहर अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती पक्षात नवचैतन्य, राजकीय वर्तुळात चर्चा
राजकारणासोबतच त्या समाजकार्यातही तितक्याच सक्रिय होत्या.
बारामती वार्तापत्र
राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या सूचनेनुसार तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली श्रीमंत आबा गणपती यांचे निष्ठावंत कार्यकर्ते किरण किसन इंगळे यांची बारामती शहर अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे शहरातील पक्षाच्या संघटनात्मक रचनेत महत्त्वपूर्ण बदल घडून आला असून, कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी किरण इंगळे यांच्या शहराध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले होते. मात्र, पक्षातील काही विघ्नसंतोषी घटकांकडून त्यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्याने ही निवड तात्पुरती स्थगित करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने अत्यंत गांभीर्याने दखल घेत चौकशी करण्याचा निर्णय घेतला. अखेर सखोल चौकशीनंतर आज ही निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.
किरण इंगळे यांच्या निवडीमागे त्यांचे पक्षासाठीचे दीर्घकाळापासूनचे निष्ठावान, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कार्य हे प्रमुख कारण मानले जात आहे. सामाजिक, राजकीय तसेच संघटनात्मक पातळीवर त्यांनी केलेले कार्य पक्षाच्या हिताचे ठरले असून, ते नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारे, जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
त्यांना सामाजिक जाणिवेचा वारसा लाभलेला आहे. त्यांची आई स्वर्गीय बायडाबाई इंगळे यांनी बारामती नगरपालिकेत नगरसेविका म्हणून प्रभावी काम केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी समाजकारणाला प्राधान्य देत सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. गरजू, गरीब आणि वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती.
राजकारणासोबतच त्या समाजकार्यातही तितक्याच सक्रिय होत्या. विविध सामाजिक उपक्रम, मदतकार्य, तसेच गरजू लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्या सदैव तत्पर असत.
त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत त्यांना शिक्षित व सुसंस्कृत नागरिक म्हणून घडवले, असे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जाते.
याशिवाय, किरण इंगळे यांचे बंधू शाम इंगळे यांनी यापूर्वी पक्षासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, संघटन बांधणीतील त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शनही या नियुक्तीसाठी महत्त्वाचे ठरल्याची चर्चा आहे.
या बदलामुळे बारामती शहरातील पक्ष संघटनेला नव्या दिशेने काम करण्याची संधी मिळणार असून, युवक व नव्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी किरण इंगळे प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाची ताकद वाढवणे, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि संघटना अधिक मजबूत करणे, यासाठी ते सक्रिय भूमिका घेतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
एकूणच, शहराध्यक्षपदी झालेल्या या बदलामुळे बारामतीच्या राजकीय वातावरणात नव्या ऊर्जेचा संचार झाला असून, येत्या काळात पक्षाच्या कार्यपद्धतीत सकारात्मक व परिणामकारक बदल दिसून येतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
चौकशीनंतर स्वच्छ प्रतिमेवर शिक्कामोर्तब
किरण इंगळे यांना हे पद मिळणार असल्याची माहिती समजल्यानंतर काही विघ्नसंतोषी लोकांनी ना. अजित पवार यांच्याकडे किरण इंगळे यांची प्रतिमा मलिन होईल, अशा स्वरूपाची माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे निवडीचे पत्र दिल्यानंतरही ना. पवार यांनी संपूर्ण चौकशी करूनच त्यांना काम करण्यास सांगावे, असे निर्देश दिले.
यानुसार एका समितीची नियुक्ती करण्यात आली. या समितीने सखोल चौकशी करून चोख अहवाल सादर केला.अहवालात किरण इंगळे हे स्वच्छ प्रतिमेचे, कोणाचीही फसवणूक, अडवणूक किंवा पिळवणूक न करणारे असल्याचे स्पष्ट झाले. काही लोकांनी केलेले आरोप यामुळे पूर्णतः खोडून निघाले.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे पक्षातील कार्यकर्त्यांना एक बाब प्रकर्षाने लक्षात आली— कस्तुरी कितीही दडपली तरी तिचा सुगंध पसरल्याशिवाय राहत नाही. किरण इंगळे यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य या चौकशीतून सर्वांसमोर आले,अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.






