दि. बारामती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी कुणाची लागणार निवडीसाठी हालचालींना वेग;अनेक नावांची जोरदार चर्चा
काही कालावधीसाठी नव्याने चेअरमनपदाची निवड

दि. बारामती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी कुणाची लागणार निवडीसाठी हालचालींना वेग;अनेक नावांची जोरदार चर्चा
काही कालावधीसाठी नव्याने चेअरमनपदाची निवड
बारामती वार्तापत्र
दि बारामती सहकारी बँकेच्या चेअरमन पदाबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या मेळाव्यात दिलेल्या सूचनेनंतर बँकेच्या विद्यमान चेअरमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता काही कालावधीसाठी नव्याने चेअरमनपदाची निवड करण्याबाबत सूचना मिळाल्याचे समजते.
या पार्श्वभूमीवर बँकेच्या संचालक मंडळात तसेच सहकार क्षेत्रात नव्या चेअरमनपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याबाबत तर्क-वितर्कांना जोर आला आहे. विशेष म्हणजे या निवडीत समतोल राखत वादग्रस्त नावे बाजूला ठेवून सर्वमान्य आणि अनुभवसंपन्न व्यक्तीची निवड करण्याचा वरिष्ठ पातळीवर विचार सुरू असल्याची चर्चा आहे.
या बहुचर्चित पदासाठी ना. अजित पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे उद्धव गावडे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे समजते. सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुण लक्षात घेता त्यांना चेअरमनपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळणारे, मित्रमंडळींच्या गराड्यात कायम वावरणारे आणि आपल्या हसमुख स्वभावामुळे परिचित असणारे शिरीष कुलकर्णी यांचे नावही चर्चेत आहे. बँकेच्या कामकाजातील त्यांचा सहभाग, विश्वासार्हता आणि सामाजिक संपर्क यामुळे त्यांना देखील वरिष्ठांची पसंती मिळत असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रामाणिक व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे विजय गालींदे यांचे नाव सध्या बँकेच्या कारभाराच्या अनुषंगाने चर्चेत आले आहे. आगामी निर्णयप्रक्रियेत त्यांच्या नावाचा देखील विचार केला जावा, अशी चर्चा सभासदांमध्ये जोर धरू लागली आहे.
गालींदे यांनी आतापर्यंत केलेल्या कार्यपद्धतीमुळे आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे अनेक संचालक व सभासद त्यांच्याकडे विश्वासार्ह पर्याय म्हणून पाहत आहेत.
बँकेच्या भविष्यातील धोरणात्मक निर्णयांसाठी अनुभवी, प्रामाणिक आणि सर्वसमावेशक विचार करणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत अनेक सभासद व्यक्त करत असून, त्या पार्श्वभूमीवर विजय गालींदे यांचे नाव चेअरमनपदाच्या शर्यतीत घेतले जात असल्याचे चित्र आहे.
याशिवाय, नव्याने आपले नशीब आजमावणारे रोहित घनवट यांचे नावही संभाव्य उमेदवारांमध्ये घेतले जात आहे. तर बारामतीतील सुप्रसिद्ध श्रीपाल हॉस्पिटलचे प्रमुख, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे डॉक्टर सौरभ मुथा यांच्या नावालाही वरिष्ठ स्तरावरून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आहे.
एकूणच, दि बारामती सहकारी बँकेच्या चेअरमनपदासाठी अनुभव, विश्वासार्हता आणि नेतृत्व क्षमता असलेल्या व्यक्तीची निवड केली जाणार असल्याचे संकेत मिळत असून, अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसांत या पदावर कोणाची निवड होते, यावर बँकेच्या भविष्यातील धोरणे आणि कार्यपद्धती अवलंबून राहणार असल्याने सहकार क्षेत्रातही उत्सुकता निर्माण झाली आहे.






