क्राईम रिपोर्ट

बारामती तालुक्यातील माळेगांव व सांगवीत अवैध व्यवसाय जोमात!,पाटोळे काका टोपण नावाचे पोलिस जोमात नागरिक मात्र कोमात

“पोलीस जोमात आणि सामान्य नागरिक कोमात”

 बारामती तालुक्यातील माळेगांव व सांगवीत अवैध व्यवसाय जोमात!,पाटोळे काका टोपण नावाचे पोलिस जोमात नागरिक मात्र कोमात

“पोलीस जोमात आणि सामान्य नागरिक कोमात”

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील माळेगाव हद्दीतील सांगवी परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मटका व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा अवैध व्यवसाय कोणतीही भीती न बाळगता सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरात सुरू असलेला बेकायदेशीर मटका व्यवसाय हा अहिवळे आणि तावरे या नावाच्या इसमांच्या माध्यमातून चालवला जात असल्याचा आरोप केला जात आहे. हा मटका व्यवसाय इतक्या निर्भयपणे सुरू असल्याने माळेगाव पोलिसांचे या अवैध धंदेवाल्यांना अप्रत्यक्ष पाठबळ आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सांगवी बीटवर कार्यरत असलेले काही पोलीस कर्मचारी हे माळेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासाठी “मलिदा” गोळा करून देत आहेत का, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. जर हे आरोप खरे ठरले, तर पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर आणि विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.

दरम्यान, माळेगाव तालुक्यात ‘पाटोळे काका’ या नावाने ओळखले जाणारे पोलीस कॉन्स्टेबल सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. ट्राफिक नियंत्रण तसेच इतर पोलिसी कारवायांमध्ये ते अतिशय सक्रिय असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे, “पोलीस जोमात आणि सामान्य नागरिक कोमात” अशी स्थिती निर्माण झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

सामान्य नागरिकांना किरकोळ कारणांसाठी कारवाईला सामोरे जावे लागत असताना, खुलेआम सुरू असलेल्या मटका व्यवसायाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी काही निवडक कर्मचारीच काम करत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू असून, याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button