शैक्षणिक

कर्तृत्व, संस्कार आणि यशाचा उत्सव : बारामतीतील देशपांडे विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

शिक्षणातून व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या परंपरेचा गौरव; विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान.

कर्तृत्व, संस्कार आणि यशाचा उत्सव : बारामतीतील देशपांडे विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

शिक्षणातून व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या परंपरेचा गौरव; विविध क्षेत्रांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान.

बारामती वार्तापत्र 

प्रमुख अतिथी, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, माजी विद्यार्थी मा. श्री. संजय संघवी यांचे उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. मान्यवरांनी सरस्वती पूजन व संस्थापकांच्या प्रतिमांचे पूजन केले.
ईशस्तवन व स्वागतगीत कु. रसिका सुर्वे व विद्यार्थिनींनी सादर केले.
प्रास्ताविकामधून स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष श्रीमती. उज्वला कुंभार यांनी ‘विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाची पोचपावती म्हणजे पारितोषिक वितरण होय. सतत केलेले कष्ट व आत्मविश्वास यामुळे यश प्राप्त होते. त्याचप्रमाणे पालक – विद्यार्थी – शिक्षक यांच्या समन्वयामुळे शाळेचा विकास होतो, असा मनोदय व्यक्त केला.
प्रमुख अतिथी मा. श्री. संजय संघवी यांनी प्रशालेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, उच्च दर्जाचे शिक्षण व संस्कार ही या शाळेची वैशिष्ट्ये आहेत. शिक्षणातून आपण स्वतःचा आणि समाजाचा विकास साधायचा आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील शिक्षकांबरोबर आलेले अनुभव सांगितले, तसेच परिश्रम व कठोर मेहनत घेतल्याशिवाय यशाचे शिखर गाठले जात नाही, असा संदेश विद्यार्थ्यांना यावेळी दिला.

दुसरे प्रमुख अतिथी, प्रशालेचे माजी विद्यार्थी मा. श्री. मयूर कांबळे ( डेप्युटी कमिशनर, इन्कम टॅक्स) म्हणाले की, शाळेचा नावलौकिक आजही टिकून आहे. प्रशालेत आल्यावर आदर, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मिळतो. शाळा हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे, जीवनात यशस्वी होण्यासाठी शाळेतले शिक्षक, मित्र महत्त्वाचे आहेत. चांगले छंद जोपासा आणि खेळात आवड निर्माण करा, असा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केला. चित्रकला, प्रयोग आदी उपक्रमातील विद्यार्थ्यांचे कौतुक करून, त्यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगतामध्ये, प्रशालेचे महामात्र प्रा. डॉ. श्री. गोविंदजी कुलकर्णी यांनी “प्रशालेतील माजी विद्यार्थी आपल्यासमोर आदर्श निर्माण करतात, यातून शाळेचे व्यक्तिमत्व घडत नाही तर व्यक्तीत्व घडत आहे. अनेक संस्कारांनी परिपूर्ण आपली प्रशाला आहे.” तसेच ‘पंच-परिवर्तन’ या संकल्पनेतील पाच आधारस्तंभ म्हणजे, नागरिक कर्तव्य व शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, स्वदेशी विचार व संकल्पना, सामाजिक समरसता आणि पर्यावरण संरक्षण. हे सर्व स्तंभ एकमेकांना पूरक असून एकत्रितपणे ते समाजात सशक्त बदल घडवण्याचे सामर्थ्य बाळगतात, असा मनोदय त्यांनी व्यक्त करत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. अजयराव पुरोहित यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक यशाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. धनंजय मेळकुंदे यांनी विद्यार्थ्यांच्या बहुआयामी गुणविकासाबद्दल समाधान व्यक्त करत, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ज्ञान, संस्कार व कर्तृत्वाच्या बळावर विद्यार्थी समाजाचे सक्षम नागरिक घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त केली. तालुका पातळी पासून राष्ट्रीय पातळी पर्यंत प्रशालेतील विद्यार्थ्याच्या यशाचा चढता आलेख अहवाल वाचनातून प्रकट केला.

कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका श्रीमती सविता हिले, समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी, स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष श्रीमती उज्वला कुंभार, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. शेखर जाधव, प्रभारी पर्यवेक्षक श्री. शशिकांत खताळ, क्रीडाध्यक्ष श्री. अनिल गावडे, पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता तावरे हेही उपस्थित होते.

दरम्यान पाककला कार्यक्रमास प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी तसेच ॲड. सौ. ऐश्वर्या कुलकर्णी उपस्थित होत्या.
तसेच विभागवार झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात डॉ. विशाखा पाटील (एमडी मेडिसिन, बुधरानी हॉस्पिटल पुणे), प्रथितयश व्यापारी श्री. प्रदीप दोषी, सौ. दिव्या धालपे (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पाटबंधारे विभाग पुणे), कु. स्वरांजली गायकवाड (वरिष्ठ लिपिक, पोलीस कमिशनर कार्यालय पुणे), व्यवस्थापक श्री. तेजस देशमुख, समन्वयक श्री. पुरुषोत्तम कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही पारितोषिक वितरण करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विविध गुणदर्शन कार्यक्रमात स्वदेशी, स्वभाषा, आत्मनिर्भर भारत, आपल्या परंपरा व पर्यावरण संरक्षण या विषयांवर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कार्यक्रम सादर केले. विभागवार कार्याध्यक्ष म्हणून श्री. ऋषिकेश बुलाख, श्री. विनायक गोसावी, सौ. मेधा चिंधे, श्री. सोमनाथ गावित, सौ. प्रगती पाटील, सौ. रेवती झाडबुके यांनी काम पाहिले. तर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कु. शर्वरी यादव, कु. शर्वरी मराठे, कु. सना बागवान तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून चि. वेदांत भागवत, चि. सागर चौहान यांना सन्मान मिळाला.

यानिमित्ताने स्थानिक सल्लागार समिती सदस्य श्री. राजीव देशपांडे, श्री. जवाहर वाघोलीकर, श्री. फणेंद्र गुजर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी दहावी, बारावी, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रशालेतील आदर्श शिक्षक परितोषिक श्री. श्रीयश सकोजी आणि श्री. हरिदास राऊत यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
त्याचप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलन (२०२५-२०२६) निमित्ताने शिक्षकांसाठी कै. म. गो. घारे निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये श्री. रवींद्र गडकर, सौ. मनीषा श्रीमंत, श्री. सोमनाथ गावित या
स्पर्धेतील विजेत्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सूत्रसंचालन श्री. संतोष शेळके यांनी केले. परिचय व स्वागत सौ. मेधा चिंधे यांनी केले. तसेच पारितोषिकांचे वाचन श्री. हरिदास राऊत यांनी केले.
श्री. राहुल पोथरकर यांनी आभार मानले.
शिक्षणसंस्था जर सातत्याने ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्व यांचा समन्वय साधत राहिल्या, तर समाज सुदृढ, समतावादी आणि मूल्याधिष्ठित होईल.
देशपांडे विद्यालयातील हा समारंभ म्हणजे शिक्षणाच्या या व्यापक तत्त्वज्ञानाची जिवंत अनुभूती होती जिथे यशाला नम्रतेची जोड, बुद्धीला करुणेची साथ आणि प्रगतीला सामाजिक बांधिलकीची दिशा मिळाली.

Back to top button