स्थानिक

बारामती येथे प्रथमच महिलांसाठी ‘बारामती हिरकणी रन २०२६’चे भव्य आयोजन

सर्व वयोगटांमध्ये मिळून एकूण ₹३,०३,८८७/- रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

बारामती येथे प्रथमच महिलांसाठी ‘बारामती हिरकणी रन २०२६’चे भव्य आयोजन

सर्व वयोगटांमध्ये मिळून एकूण ₹३,०३,८८७/- रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

बारामती वार्तापत्र 

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचे आरोग्य, शारीरिक क्षमता आणि सक्षमीकरण यांना चालना देण्यासाठी बारामती शहरात प्रथमच केवळ महिलांसाठी ‘बारामती हिरकणी रन २०२६’ या भव्य क्रीडा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता आयोजित करण्यात येणार असून, बारामती तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.

ही रन स्पर्धा बारामतीचे माजी नगराध्यक्ष कै. धोंडीबा आबाजी सातव यांच्या स्मरणार्थ गेली १६ वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या कारभारी आण्णा चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी बारामती हेल्थ क्लब व बारामती रनर्स यांनी संयुक्त विद्यमाने पुढाकार घेतला आहे.

महिलांसाठी स्वतंत्र व प्रेरणादायी उपक्रम महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना फिटनेसकडे वळवणे तसेच आत्मविश्वास वाढवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. “हिरकणी” हे नाव महिलांच्या धैर्य, सामर्थ्य आणि कर्तृत्वाचे प्रतीक म्हणून देण्यात आले आहे.

ही रन स्पर्धा तिरंगा सर्कल (तीन हत्ती चौक) ते पेन्सिल चौक या मार्गावर पार पडणार असून ५ कि.मी. व १० कि.मी. अशा दोन प्रकारांत घेण्यात येणार आहे. १५ वर्षांवरील सर्व मुली व महिलांसाठी ही स्पर्धा खुली आहे.

नोंदणी प्रक्रिया स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी दि. २६ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या
👉 www.baramatihirkanirun.com किंवा Konfhub Platform वरून दि. ०१ मार्च २०२६ पूर्वी नोंदणी करणे बंधनकारक आहे.

स्पर्धेची रूपरेषा व नोंदणी शुल्क ही स्पर्धा खालील सहा वयोगटांमध्ये घेण्यात येणार आहे –
१५ ते २५ वर्षे
२६ ते ३५ वर्षे
३६ ते ४५ वर्षे
४६ ते ५५ वर्षे
५६ वर्षे वरील
ओपन गट
नोंदणी शुल्क :
५ कि.मी. रन : ₹५५५/-
१० कि.मी. रन : ₹९९९/-
सहभागी स्पर्धकांसाठी सुविधा
या स्पर्धेत सुमारे २५०० ते ३००० महिलांचा सहभाग अपेक्षित आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला –
आकर्षक ब्रँडेड कलर टी-शर्ट
मेडल व प्रमाणपत्र
नाष्टा, एनर्जी ड्रिंक व फ्रूट बास्केट
वैद्यकीय सुविधा
पुरवण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेचे थेट लाईव्ह प्रक्षेपण KPL युट्युब चॅनलवरून करण्यात येणार आहे.
आकर्षक बक्षिसांचा वर्षाव
प्रत्येक वयोगटातून विजेती व उपविजेती निवडल्या जाणार असून त्यांना –
ट्रॉफी
आकर्षक मेडल
प्रमाणपत्र
रोख पारितोषिक
देण्यात येणार आहे. सर्व वयोगटांमध्ये मिळून एकूण ₹३,०३,८८७/- रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
महिलांच्या सक्षमीकरणाकडे एक पाऊल
‘बारामती हिरकणी रन २०२६’ हा उपक्रम केवळ एक स्पर्धा नसून महिलांना आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवणारा, प्रेरणादायी आणि समाजात सकारात्मक संदेश देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Back to top button