प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्याने बारामतीत संताप; नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक
नगरपालिकेकडून दिलगिरी व्यक्त

प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्याने बारामतीत संताप; नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक
नगरपालिकेकडून दिलगिरी व्यक्त
बारामती वार्तापत्र
26 जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र बारामती नगर परिषदेमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन न झाल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगर परिषदेमध्ये महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते.
मात्र भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कार्यक्रमस्थळी न लावल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले. हा प्रकार जाणीवपूर्वक केल्याचा आरोप करत मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायांनी बारामती नगरपालिकेसमोर निषेध आंदोलन केले.
नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिन सातव हे सुपे या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचार निमित्त गेले असता त्या ठिकाणी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई फेक करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेत नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान सहन केला जाणार नाही” तसेच “संविधान दिनी संविधानकर्त्यालाच डावलणे ही गंभीर बाब आहे” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली असून भविष्यात अशी चूक पुन्हा झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
या घटनेमुळे बारामतीतील राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असतानाच, बारामती नगरपालिकेच्या वतीने यासंदर्भात स्पष्टीकरण देत जाहीर दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. नगरपालिकेने स्पष्ट केले की, 26 जानेवारी 2026 रोजी ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन न होणे ही चूक असून, यामागे कोणताही अपमानाचा किंवा दुर्लक्षाचा हेतू नव्हता.
संविधानप्रेमी नागरिकांच्या भावना लक्षात घेता प्रशासनाने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढील काळात शासनाचे निर्णय, परिपत्रके तसेच समाजातील लोकभावना लक्षात घेऊन सर्व राष्ट्रपुरुषांचा योग्य व यथोचित सन्मान राखण्यात येईल, अशी ग्वाही नगरपालिकेने दिली आहे. भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा होऊ नये यासाठी आवश्यक ती दक्षता घेतली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे बारामती शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, नगरपालिकेच्या दिलगिरीनंतर पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.






