एर्नाकुलमचे गणेश आनंदकृष्णन यांनी उलगडले कमळ शेतीचे अर्थशास्त्र : टीसी महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
सुमारे २०० विद्यार्थ्यांनी व कमळप्रेमी यांनी भाग घेतला.

एर्नाकुलमचे गणेश आनंदकृष्णन यांनी उलगडले कमळ शेतीचे अर्थशास्त्र : टीसी महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
सुमारे २०० विद्यार्थ्यांनी व कमळप्रेमी यांनी भाग घेतला.
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील वनस्पतीशास्त्र विभाग व उद्योजकता विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कमळ शेती: उद्योजकतेचा बहरता मार्ग’ ही एकदिवसीय कार्यशाळा जीवराज सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी केरळमधील एर्नाकुलम येथील प्रसिद्ध कमळ तज्ज्ञ श्री.गणेश आनंदकृष्णन यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कार्यशाळेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. गणेश आनंदकृष्णन हे ‘इंटरनॅशनल वॉटर गार्डन रजिस्ट्री’ मध्ये स्वतःच्या संकरित कमळ जातीची नोंदणी करणारे भारतातील अग्रगण्य संशोधक आहेत.
त्यांनी विकसित केलेल्या ‘मिरॅकल’ आणि ‘अखिला’ यांसारख्या नवीन कमळ वाणांनी जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले आहे. कार्यशाळेत त्यांनी कमळ फुले संकरीकरण तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेतील संधींबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
तसेच कमळ लागवडीबाबत प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी विकसित केलेल्या हायब्रिड तंत्रज्ञानामुळे कमळाला अधिक आकर्षक रंग आणि आकार मिळतो, फुलांचे ‘शेल्फ लाईफ वाढते, कमी जागेत आणि टबमध्येही व्यावसायिक शेती करणे शक्य होते.
त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कमळ हे केवळ धार्मिक महत्त्वाचे फूल नसून, औषधी आणि खाद्य उद्योगातही याला मोठी मागणी आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास कमळ लागवड क्षेत्रातूनही मोठे उत्पन्न मिळवता येते.
कमळापासून तयार केलेल्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा वापर करता येतो असेही त्यांनी सांगितले. कमळ फुल पिकामध्ये संशोधनाच्या खूप संधी आहेत असे त्यांनी नमूद केले. कमळ वनस्पतीचा जीवनक्रम व उपयोग या विषयावरती सखोल मार्गदर्शन करताना कमळ या वनस्पतीच्या फुलाचे देठापासून कापड उद्योगाला कच्चा माल उपलब्ध होतो याची माहिती सांगितली.
कमळ कंदाचा आरोग्यदायी सेंद्रिय भाजी म्हणून खाण्यासाठो उपयोग होतो. कमळाचे मानवी जीवनातील महत्वही त्यांनी अधोरेखित केले. नवीन जाती कशाप्रकारे विकसित केल्या जाऊ शकतात याबाबत मार्गदर्शन केले तसेच कमळ वनस्पतीच्या रोप लागवडीबाबत प्रात्यक्षिक सादर केले.
या कार्यशाळेचे मुख्य आकर्षण ठरले वनस्पती शास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेले ‘कमळ: विज्ञान, कला आणि संस्कृती या विषयावरील प्रदर्शन.
या प्रदर्शनात वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी कमळाच्या विविध हस्तकला आणि माहितीपूर्ण पोस्टर्सचे सादरीकरण केले. कमळाचा उपयोग केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, तर विज्ञान आणि संस्कृतीत कसा होतो, याचे उत्कृष्ट दर्शन विद्यार्थ्यांनी घडवले. प्रदर्शनाचा उदघाटन सोहळा महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. अविनाश जगताप व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यशाळेसाठी सुमारे २०० विद्यार्थ्यांनी व कमळप्रेमी यांनी भाग घेतला.
या उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार असून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा, कृषी-उद्योजकतेकडे वळावे असे आवाहन करून कृषी उद्योजक होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.भगवान माळी, उद्योजगता विकास मंचाच्या समन्वयक प्राजक्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्रा.डॉ.महादेव कानडे, प्रा.डॉ.अजित तेलवे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यशाळेचे नियोजन पहिले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कार्यशाळा समन्वयक डॉ. माधुरी पाटील यांनी केले.






