बारामतीतील बहुजन समाज पार्टीचे नेते काळूराम चौधरी यांचा झेडपी–पंचायत समिती निवडणूक न लढवण्याचा निर्णय; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
कायम विरोधी भूमिका असलेल्या नेत्याकडून असा निर्णय

बारामतीतील बहुजन समाज पार्टीचे नेते काळूराम चौधरी यांचा झेडपी–पंचायत समिती निवडणूक न लढवण्याचा निर्णय; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
कायम विरोधी भूमिका असलेल्या नेत्याकडून असा निर्णय
बारामती वार्तापत्र
बारामती शहरात आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याच वेळी बहुजन समाज पार्टीचे बारामतीतील प्रमुख नेते काळूराम चौधरी यांनी केलेले मनोगत विशेष लक्षवेधी ठरले.
सामान्यतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात ठाम भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जाणारे काळूराम चौधरी यांनी यावेळी एक वेगळाच राजकीय संदेश दिला.
त्यांनी बारामती व बारामती तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय जाहीर केला.
काळूराम चौधरी यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये बहुजन समाज पार्टीकडून कोणताही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी प्रचार केला जाणार नाही. तसेच बसपाचे अधिकृत उमेदवार उभे न करता, निवडणुकीसाठी सुरू असलेली सर्व तयारी व प्रचार यंत्रणा थांबवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
या घोषणेमुळे बहुजन समाज पार्टीकडून अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला एकतर्फी पाठिंबा दिला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, कायम विरोधी भूमिका असलेल्या नेत्याकडून असा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या निर्णयामागे सामाजिक सलोखा, राजकीय परिपक्वता आणि वैयक्तिक आदरभाव असल्याचे संकेत चौधरी यांनी दिले. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवरील राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या अनपेक्षित निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बारामतीच्या राजकारणात हा निर्णय आगामी निवडणुकांवर कितपत परिणाम करणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.






