स्थानिक

बारामती नगरपालिकेला माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

अजितदादांचे स्वप्न साकार करु

बारामती नगरपालिकेला माझी वसुंधरा अभियानांतर्गत राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

अजितदादांचे स्वप्न साकार करु

बारामती वार्तापत्र 

राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत बारामती नगरपरिषदेने 40 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.या मध्ये बारामती नगरपरिषदेला राज्य शासनाकडून पाच कोटींचे पारितोषिक मिळणार आहे.

शनिवारी (ता. 21) मुंबईत होणा-या समारंभात हे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. हा प्रथम क्रमांक दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना समर्पित करत असल्याची भावना बारामतीकरांनी बोलून दाखवली.

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्त्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 40 हजार ते 1 लाख लोकसंख्या गटात बारामती नगरपरिषदेने राज्यात बाजी मारत प्रथम क्रमांकावर नाव कोरले आहे.

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी बारामती नगरपालिकेने केलेल्या कामगिरीबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने हा पुरस्कार बारामती नगरपालिकेला देण्यात आला आहे.

बारामती नगरपरिषदेने गेल्या काही वर्षांमध्ये स्वच्छता अभियानाच्या बाबतीत घेतलेला पुढाकार व बारामती शहरांमध्ये केलेले वेगवेगळे बदल यांची दखल घेत या पुरस्कारासाठी बारामती नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी व बारामती नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासह इतर सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त करता आल्याची प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आली.

बारामती स्वच्छ व सुंदर असावी या साठी सातत्याने आग्रही असलेले अजितदादा आज हे यश पाहण्यासाठी नसल्याची खंत नगरपरिषदेसह बारामतीकरांनाही आहे. तुमच्या स्वप्नातील बारामती साकारण्यासाठी बारामतीकरच पुढे येतील, तरीही दादा आम्ही तुम्हाला आज मिस करतो, अशी प्रतिक्रीया अनेक नागरिकांनी बोलून दाखवली.

अजितदादांचे स्वप्न साकार करु

इंदूरच्या धर्तीवर देशातील सर्वात सुंदर व स्वच्छ शहर म्हणून बारामतीची ओळख व्हावी ही अजितदादांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही जिवाचे रान करु. या प्रथम क्रमांकाबद्दल मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी वर्गाचे व बारामतीकरांचेही अभिनंदन. लोकसहभागाशिवाय हे यश मिळणे अशक्य होते – सचिन सातव, नगराध्यक्ष,बा.न.प.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या प्रत्येक घटकाने घेतलेले परिश्रम, नागरिकांनी दिलेला प्रतिसाद या मुळे राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करणे शक्य झाले. अजितदादा पवार यांचे देशातील सर्वात स्वच्छ शहर हे स्वप्न पूर्ण करणे हे आमचे आता ध्येय असेल- पंकज भुसे,मुख्याधिकारी, बा.नप.

Back to top button