बारामती नगरपालिकेत ‘पतिराज’चाच कारभार? पत्नी फक्त नावापुरती नगरसेविका!
महिला प्रतिनिधी अनुपस्थित

बारामती नगरपालिकेत ‘पतिराज’चाच कारभार? पत्नी फक्त नावापुरती नगरसेविका!
महिला प्रतिनिधी अनुपस्थित
बारामती वार्तापत्र
माळेगावनंतर आता बारामती नगरपालिकेतही ‘पत्नीच्या जागी पती’ कारभार करत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ला मोठे यश मिळाले होते. विशेषतः महिला उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. स्थानिक पातळीवर महिलांना संधी देत त्यांचा सन्मान केल्याची भावना व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर महिला सक्षमीकरणाचा आदर्श उभा राहील, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती.
मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे या अपेक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निवडून आलेल्या काही महिला नगरसेविकांच्या जागी त्यांच्या पतींची सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि प्रशासकीय कामकाजात वाढती उपस्थिती दिसून येत असल्याची चर्चा आहे. अधिकृत पद महिलांकडे असताना प्रत्यक्ष बैठका, निर्णयप्रक्रिया आणि अधिकाऱ्यांशी संवाद यामध्ये पती हस्तक्षेप करत असल्याचे बोलले जात आहे.
नुकतीच कचरा डेपो येथे घनकचरा व्यवस्थापन आणि विक्री प्रक्रिये संदर्भात नगरपालिकेच्या नगरसेवक व सभापती यांची बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित महिला प्रतिनिधी अनुपस्थित असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यांच्या पतींची उपस्थिती आणि सहभाग लक्षवेधी ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे ‘नगरसेविका की पतिराज?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजातही काही ठिकाणी पतींचा वावर वाढल्याची चर्चा आहे. कर्मचारी वर्गामध्ये याबाबत नाराजी असल्याचेही समजते. अधिकृत अधिकार नसतानाही काही जण निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्यास प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि लोकशाही प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे.
महिला आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना राजकारणात संधी देण्यामागील उद्देश त्यांचे नेतृत्व विकसित होणे हा आहे. मात्र प्रत्यक्षात ‘पतींचा कारभार’ सुरू असल्याची भावना बळावल्यास महिला धोरणाच्या प्रभावावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात.
या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित महिला प्रतिनिधी, नगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन यांची अधिकृत भूमिका काय आहे, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. बारामतीतील हा प्रकार पुढे कोणते वळण घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






