जिज्ञासा, नवकल्पना आणि विज्ञानाची गोडी; शहा ग्लोबल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात
प्राथमिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘मॅजिक पेंटिंग’ प्रयोगाने वेधले सर्वांचे लक्ष, विज्ञान प्रदर्शनात सर्जनशीलतेची झलक
जिज्ञासा, नवकल्पना आणि विज्ञानाची गोडी; शहा ग्लोबल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात
प्राथमिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; ‘मॅजिक पेंटिंग’ प्रयोगाने वेधले सर्वांचे लक्ष, विज्ञान प्रदर्शनात सर्जनशीलतेची झलक
आदित्य बोराटे –
विज्ञान म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील सूत्रे नव्हेत, तर विचार करण्याची सवय आणि शोध घेण्याची वृत्ती याच संदेशाने शहा ग्लोबल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात दिवसभर वैज्ञानिक वातावरण, जिज्ञासा आणि आनंदी शिक्षणाची अनुभूती मिळाली.
कार्यक्रमाची सुरुवात विशेष प्रार्थना सभेने झाली. प्रमुख पाहुण्या म्हणून अकॅडमीक मॅनेजर डॉ. श्रीविद्या वरदराजन उपस्थित होत्या. व्यवस्थापन सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन प्रगती डोंगरे मॅडम यांनी प्रभावी शब्दांत केले. त्यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारण्याची आणि शोध घेण्याची वृत्ती जोपासण्याचे महत्त्व पटवून दिले.
यानंतर डॉ. श्रीविद्या वरदराजन यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या ‘रमण परिणाम’ या शोधामुळे भारताला जागतिक स्तरावर सन्मान मिळाला आणि त्यांना नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सभेनंतर विज्ञान प्रदर्शनाचे रिबन कापून उद्घाटन करण्यात आले. ‘मॅजिक पेंटिंग’ या अनोख्या प्रयोगाने सर्वांचे लक्ष वेधले. कोऱ्या कागदावर पाणी फिरवताच “Science Exhibition मध्ये आपले स्वागत आहे” हा संदेश प्रकट झाला आणि उपस्थितांमध्ये आनंदाची लहर पसरली.
प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. इयत्ता पहिलीतील १२, दुसरीतील ११, तिसरीतील ५ आणि चौथीतील ५ विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले. लहान वयातच त्यांनी आत्मविश्वासाने विज्ञानाचे सादरीकरण करत आपली सर्जनशीलता दाखवली.ज्ञान, प्रयोग आणि आनंद यांची सुंदर सांगड घालत राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.






