भाडेकरू नोंदीचा वाद;बारामतीत घरपट्टी वाढीवरून खळबळ,नगरसेवक सुनिल सस्ते यांचा नागरिकांना आवाहन
तब्बल २० टक्क्यांची वाढ

भाडेकरू नोंदीचा वाद;बारामतीत घरपट्टी वाढीवरून खळबळ,नगरसेवक सुनिल सस्ते यांचा नागरिकांना आवाहन
तब्बल २० टक्क्यांची वाढ
बारामती वार्तापत्र
बारामतीत अवाजवी घरपट्टी वाढीच्या मुद्द्यावरून वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, नगरपरिषद प्रशासनाच्या निर्णयाविरोधात नगरसेवक सुनील सस्ते यांनी चुकीच्या नोंदी करून तब्बल २० टक्क्यांची वाढ लादण्यात आल्याचा आरोप त्यांनी करत नागरिकांना एकजूट होण्याचे आवाहन केले आहे.
बारामती नगरपरिषद हद्दीत अनेक नागरिकांच्या स्वतःच्या मालकीच्या घरांवर व दुकानांवर खाजगी स्थापत्य कन्सल्टन्सीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणादरम्यान संबंधित मालमत्तांवर “भाडेकरू” अशी चुकीची नोंद करण्यात आल्याचा गंभीर आरोप सस्ते यांनी केला आहे. प्रत्यक्षात मालक स्वतः वास्तव्य करत असतानाही भाडेकरू नोंद झाल्यामुळे करआकारणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी घरपट्टीची रक्कम हजारो ते लाखो रुपयांनी वाढून सर्वसामान्य बारामतीकरांच्या माथी वाढीव आर्थिक बोजा टाकण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर्षी घरांची प्रत्यक्ष मोजणी, भाडेकरू नोंद, उपभोक्ता कर तसेच चतुर्थ वार्षिक कर आकारणी या माध्यमातून सरळ २० टक्के वाढ करण्यात आल्याचा दावा सस्ते यांनी केला. विशेष म्हणजे, या वाढीबाबत महाराष्ट्र शासनाचा कोणताही शासन निर्णय (जीआर) उपलब्ध नसल्याची माहिती घेतल्यानंतर समोर आले असून, अशा प्रकारची आकारणी केवळ बारामतीतच सुरू असल्याची खात्री झाल्याचे त्यांनी सांगितले.
खाजगी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या या सर्वेक्षण आणि करआकारणी प्रक्रियेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्थापत्य कन्सल्टन्सी (अमरावती), एनडीके आणि समुद्रा इलेक्ट्रॉनिक्स (पुणे) या संस्थांना अवाजवी देयके अदा केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रशासकीय कालावधीत सुरू असलेला हा प्रकार “जिजिया करापेक्षा वेगळा नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी प्रशासनावर निशाणा साधला.
या पार्श्वभूमीवर बुधवार (दि. ४) पासून शहरात रिक्षाद्वारे दवंडी देत नागरिकांना “अवाजवी घरपट्टी भरू नका” असे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच वाढीव घरपट्टीविरोधात अधिकृत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांनी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत सस्ते यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भेट देताना चालू व मागील वर्षांची घरपट्टी बिले (झेरॉक्स प्रतींसह) आणावीत,असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,या प्रकरणामुळे बारामती शहरात संतापाची लाट उसळली असून,प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण देऊन नागरिकांना दिलासा द्यावा,अशी मागणी होत आहे. येत्या काही दिवसांत या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






