बारामतीत भीषण अपघात; पारवडी येथील २५ वर्षीय महिलेचा मृत्यू
चालकाने राँग साईटने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक

बारामतीत भीषण अपघात; पारवडी येथील २५ वर्षीय महिलेचा मृत्यू
चालकाने राँग साईटने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील पारवडी परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुपाली मयूर कोकणे (वय २५, रा. पारवडी, ता. बारामती, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबतची खबर सचिन शिवाजी कोकणे (वय ३६, व्यवसाय वकिली, रा. पारवडी) यांनी पोलिसांना दिली.
खबर देणाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८.४५ वाजण्याच्या सुमारास रुपाली कोकणे या आपल्या पती मयूर कोकणे आणि दोन लहान मुलांसह दुचाकीवरून पारवडीकडे जात होत्या. यावेळी समोरून येणाऱ्या वॅगनर कार (क्रमांक MH-42 BJ-1404) चालकाने राँग साईटने येत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रुपाली कोकणे गंभीर जखमी झाल्या.
जखमी अवस्थेत त्यांना तातडीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री १०.१५ वाजण्यापूर्वी घडल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या घटनेची नोंद ५ मार्च २०२६ रोजी रात्री १२.४८ वाजता बारामती तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक २६/२०२६ (BNSS १९४) अंतर्गत करण्यात आली आहे.
दरम्यान, या अपघातात राँग साईटने वाहन चालवत धडक दिल्याचा आरोप संबंधित वॅगनर चालकावर करण्यात आला असून, त्याबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस हवालदार थोरवे करीत असून अधिक तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे पारवडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर रस्त्यांवरील बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






