बारामती पंचायत समितीला नवे नेतृत्व; किरण तावरे सभापती, शुभांगी आगवणे उपसभापती
किरण तावरे हे पणदरे गटातून पंचायत समितीसाठी निवडून आले आहेत.

बारामती पंचायत समितीला नवे नेतृत्व; किरण तावरे सभापती, शुभांगी आगवणे उपसभापती
किरण तावरे हे पणदरे गटातून पंचायत समितीसाठी निवडून आले आहेत.
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी सांगवी येथील किरण रावसाहेब तावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपसभापतीपदी गुणवडी पंचायत समिती गणातील शुभांगी सुनील आगवणे यांची निवड करण्यात आली. पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
बारामती तालुका हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असल्याने या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. पक्ष संघटना, स्थानिक राजकीय समीकरणे आणि आगामी विकासकामांच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
किरण तावरे हे पणदरे गटातून पंचायत समितीसाठी निवडून आले आहेत. संघटन कौशल्य, प्रशासनातील अनुभव आणि तालुक्याच्या प्रश्नांची जाण लक्षात घेऊन त्यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जाते. पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.
तावरे यांना यापूर्वीही राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच त्यांच्या पत्नी मीनाक्षी तावरे या यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे तावरे कुटुंबाला स्थानिक राजकारणाचा मोठा अनुभव असल्याचे मानले जाते.
दरम्यान, बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी किरण तावरे यांच्यासह दिग्विजय जगताप आणि जितेंद्र पवार यांची नावेही चर्चेत होती. मात्र पक्ष संघटना, प्रशासकीय अनुभव आणि तालुक्याबद्दल असलेले ज्ञान लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी किरण तावरे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर येत आहे. तर उपसभापतीपदी नव्यानेच पंचायत समितीत निवडून आलेल्या शुभांगी आगवणे यांना संधी देण्यात आली.
पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी किरण तावरे व शुभांगी आगवणे या दोघांचेच अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे या दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सभापतीपदी निवड झाल्यानंतर किरण तावरे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. शेतकरी, महिला आणि युवकांसाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी बोलताना तावरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांनी दिलेल्या संधीचे आपण निश्चितच सोने करू. बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहणार आहोत. आज सभापती म्हणून निवड होत असताना अजितदादांची उणीव जाणवत असली तरी त्यांना अभिप्रेत असलेले काम करून दाखवू, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, किरण तावरे यांच्या रूपाने बारामती पंचायत समितीला अनुभवी नेतृत्व मिळाल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. अजितदादांचे निकटवर्ती म्हणून ओळख असलेले किरण तावरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदीही जबाबदारी सांभाळली आहे.
तसेच त्यांनी संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली आहे. तालुक्यातील प्रश्नांचा चांगला अभ्यास आणि प्रशासकीय कामाचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या निवडीकडे विशेष लक्ष लागले होते.
स्थानिक पातळीवर काम करताना त्यांनी विविध सामाजिक आणि विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे बारामती पंचायत समितीच्या सभापतीपदी त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






