बारामतीतील नगरसेवकावर विधवा महिलेचा छळ, मारहाण व धमकीचा गुन्हा; नगरसेवक किशोर मासाळ यांनी आरोप फेटाळले
वेळोवेळी तिच्या घरात अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप

बारामतीतील नगरसेवकावर विधवा महिलेचा छळ, मारहाण व धमकीचा गुन्हा;नगरसेवक किशोर मासाळ यांनी आरोप फेटाळले
वेळोवेळी तिच्या घरात अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप
बारामती वार्तापत्र
विधवा महिलेच्या असहाय्यता आणि ओळखीचा गैरफायदा घेत वेळोवेळी तिच्या घरात अनधिकृत प्रवेश करून शरीरसुखाची मागणी करणे, अंगाशी लगट करणे, धमक्या देणे, बदनामी करण्याची भीती दाखविणे, पाठलाग करणे आणि मारहाण करणे प्रकरणी बारामती नगरपरिषदेचे नगरसेवक किशोर मासाळ यांच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकणी एका ४५ वर्षीय विधवा महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिची असहाय्यता आणि ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने वेळोवेळी तिच्या घरात अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप आहे.
तसेच शरीरसुखाची मागणी करणे, अंगाशी लगट करणे, धमक्या देणे, बदनामी करण्याची भीती दाखविणे, पाठलाग करणे आणि मारहाण करणे असे गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आले आहेत. ही घटना १३ फेब्रुवारी २०२६ ते २५ मे २०२६ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद असून ३० मे रोजी पहाटे बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करीत आहेत.
किशोर मासाळ यांची भूमिका
या प्रकरणातील आरोपी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी जेष्ठ नगरसेवकांच्या गटातून नगरसेवक झालो असून विविध घडामोडींवर सातत्याने भाष्य करत असल्यामुळे छोट्या नेत्याच्या सांगण्यावरून मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या मी बारामती बाहेर असून बारामतीत परतल्यानंतर पोलीस प्रशासनास सर्व पुरावे सादर करणार आहे,” असे मासाळ यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपासातून नेमके सत्य समोर येणार आहे..






