स्थानिक

बारामती शहर पोलिसांचे नागरिकांना कॅमेरा बसवण्याचे आवाहन

वाहन चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न

बारामती शहर पोलिसांचे नागरिकांना कॅमेरा बसवण्याचे आवाहन

वाहन चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न

बारामती वार्तापत्र 

माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार साहेब तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीसांकडून दररोज प्रमुख चौक, रस्ते, संवेदनशील ठिकाणे व शहरातील प्रवेश मार्गांवर नाकाबंदी, वाहन तपासणी, रात्रीची गस्त, पेट्रोलिंग आणि गुन्हे प्रतिबंधात्मक कारवाया सातत्याने करण्यात येत आहेत.

वाहन चोरी, चैन स्नॅचिंग, घरफोडी आणि मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आजच्या आधुनिक काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशिवाय गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि प्रत्येक गुन्ह्याचा जलद तपास करणे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.

चोरटे आता अत्यंत शिताफीने काम करीत आहेत. ते मुख्य रस्ते टाळून गल्ल्या, बोळ, वस्ती भाग आणि कमी वर्दळीच्या ठिकाणांचा वापर करतात. अनेक वेळा गुन्हा करून काही मिनिटांत परिसर सोडून देतात. अशा परिस्थितीत सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यास आरोपींची ओळख पटविणे, त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणे आणि चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे अधिक कठीण बनते.

आज बारामती शहर व परिसरात वाहन चोरी, घरफोडी आणि चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे निदर्शनास येत आहे. या टोळ्या रात्रीच नव्हे तर दिवसाही शहरात प्रवेश करून गुन्हे करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्ही नेटवर्क ही काळाची गरज बनली आहे.

याच पार्श्वभूमीवर एक सकारात्मक उदाहरण समोर आले आहे. गुणवडी गावामध्ये अवघ्या काही दिवसांत संपूर्ण गाव सीसीटीव्ही कव्हरेजखाली आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गावातील प्रमुख रस्ते, चौक, प्रवेशद्वारे आणि महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविले जात असून त्यामुळे गुन्हेगारांवर मोठा प्रतिबंध निर्माण होणार आहे. भविष्यात त्या गावात चोरी किंवा इतर गुन्हे करण्यापूर्वी गुन्हेगारांना अनेकदा विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे.*

अशीच व्यापक आणि दूरदृष्टीची योजना मळद, पिंपळी, मेडद, डोरलेवाडी तसेच बारामती शहर परिसरातील सर्व गावांमध्ये आणि शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, प्रवेशद्वारे, नाके, गल्ल्या, बोळ, व्यापारी संकुले, सोसायट्या आणि निवासी भागांमध्ये राबविण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

बारामती शहर पोलिसांचे सर्व नागरिक, व्यापारी, ग्रामपंचायती, गृहनिर्माण संस्था, हौसिंग सोसायट्या, उद्योग समूह आणि सामाजिक संस्थांना नम्र आवाहन आहे की,
आपल्या घर, दुकान, कार्यालय आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.

प्रत्येक सोसायटीने सामूहिक सुरक्षा यंत्रणा उभारावी.

ग्रामपंचायतींनी गावातील प्रमुख ठिकाणी सार्वजनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यास प्राधान्य द्यावे.

व्यापारी संघटनांनी बाजारपेठा आणि व्यावसायिक संकुलांमध्ये कॅमेरे बसविण्यास पुढाकार घ्यावा.

नागरिकांनी सीसीटीव्ही बसविणे ही खर्चाची बाब नसून कुटुंब, मालमत्ता आणि भविष्यातील सुरक्षेची गुंतवणूक आहे हे लक्षात घ्यावे.

आज प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराच्या सुरक्षेमध्ये सहभाग घेतला तर उद्या गुन्हेगारांसाठी बारामती शहर आणि परिसर सुरक्षित नव्हे तर अभेद्य बनेल.

पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकतात; पण सीसीटीव्ही प्रत्येक क्षणी पहारा देऊ शकतो.

Back to top button