बारामतीत गरुडबाग परिसरात स्कुटीचा भीषण अपघात; स्पीड ब्रेकरच्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्याचा आरोप
संबंधित स्पीड ब्रेकरवर तातडीने पांढरे पट्टे, परावर्तित चिन्हे आणि इशारा फलक लावावेत

बारामतीत गरुडबाग परिसरात स्कुटीचा भीषण अपघात; स्पीड ब्रेकरच्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्याचा आरोप
संबंधित स्पीड ब्रेकरवर तातडीने पांढरे पट्टे, परावर्तित चिन्हे आणि इशारा फलक लावावेत
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील गरुडबाग परिसरात रविवारी सकाळी एका स्कुटीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात अमोल एकनाथ मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल मोरे हे स्कुटीवरून जात असताना रस्त्यावरील गतिरोधकाचा (स्पीड ब्रेकर) अंदाज न आल्याने त्यांची स्कुटी अचानक अनियंत्रित झाली. भरधाव वेगात असलेल्या स्कुटीला जोरदार धक्का बसल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि भीषण अपघात झाला.
अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की स्कुटीच्या मागील चाकाचा शॉकअब्झॉर्बर तुटून चाक वेगळे झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील अमोल मोरे यांना तातडीने बारामतीतील मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडले होते. तसेच अपघाताच्या धडकेत मानवी शरीराचे काही तुकडे रस्त्यावर पडल्याचे नागरिकांनी सांगितले. या तुकड्यांवर कावळे तुटून पडल्याचे धक्कादायक दृश्य काही नागरिकांनी पाहिल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. संबंधित ठिकाणी काही दिवसांपूर्वी स्पीड ब्रेकर उभारण्यात आला होता; मात्र त्यावर आवश्यक असलेले पांढरे रंगाचे पट्टे किंवा इशारा फलक लावण्यात आले नव्हते.
त्यामुळे वाहनचालकांना गतिरोधकाचा अंदाज येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.विशेष म्हणजे, याच स्पीड ब्रेकरवर यापूर्वीही अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. वारंवार अपघात होत असतानाही प्रशासनाने योग्य उपाययोजना न केल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
“नागरिकांचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवाल परिसरातील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित स्पीड ब्रेकरवर तातडीने पांढरे पट्टे, परावर्तित चिन्हे आणि इशारा फलक लावावेत, तसेच अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या त्रुटींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.






