अखेर बारामती दूध संघाच्या अध्यक्षपदी किशोर फडतरे तर व्हाईस चेअरमनपदी पुरुषोत्तम गाढवे यांची बिनविरोध निवड
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार निवड

अखेर बारामती दूध संघाच्या अध्यक्षपदी किशोर फडतरे तर व्हाईस चेअरमनपदी पुरुषोत्तम गाढवे यांची बिनविरोध निवड.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार निवड
बारामती वार्तापत्र
बारामतीत गेल्या काही महिन्यांपासून दूध संघाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या राजकीय हालचाली, राजीनामा नाट्य आणि विविध घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार दूध संघाच्या चेअरमनपदी सिद्धेश्वर निंबोडी येथील किशोर फडतरे तर व्हाईस चेअरमनपदी आंबी येथील पुरुषोत्तम गाढवे यांची निवड करण्यात आली.
आज दूध संघाच्या मुख्यालयात संचालक मंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नव्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या नेतृत्वाबाबतच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला.
विद्यमान चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षनेतृत्व कोणाच्या खांद्यावर जबाबदारी देणार याबाबत तालुक्यात उत्सुकता निर्माण झाली होती. गेल्या काही महिन्यांत नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावरून अनेक बैठका, खलबते आणि राजकीय हालचाली घडल्या. अखेर सर्व घडामोडींनंतर आज नव्या नेतृत्वाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आणि संघाला नवी दिशा देण्यासाठी फडतरे-गाढवे या जोडीची निवड करण्यात आली.
बारामती दूध संघ हा परिसरातील हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी थेट जोडलेला असल्याने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दूध संकलन वाढवणे, शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देणे, संघाची आर्थिक घडी अधिक मजबूत करणे आणि दुग्ध व्यवसायाला चालना देणे ही आगामी काळातील प्रमुख आव्हाने नव्या नेतृत्वासमोर असणार आहेत.
नवीन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्याकडून दूध संघाच्या विकासाला गती मिळेल आणि दूध उत्पादकांच्या अपेक्षांची पूर्तता होईल असा विश्वास संचालक, कार्यकर्ते आणि शेतकरी व्यक्त करत आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.






