बारामतीतील विश्वासनगर येथील देवराज रेसिडेन्सी चार्जिंगदरम्यान ई-स्कूटरला आग; चार दुचाकी, कारसह लाखोंचे नुकसान
पार्किंगमधील चार दुचाकी जळाल्या

बारामतीतील विश्वासनगर येथील देवराज रेसिडेन्सी चार्जिंगदरम्यान ई-स्कूटरला आग; चार दुचाकी, कारसह लाखोंचे नुकसान
पार्किंगमधील चार दुचाकी जळाल्या
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील गुणवडी रोड परिसरातील विश्वासनगर येथील देवराज रेसिडेन्सी सोसायटीमध्ये चार्जिंगला लावलेल्या एका एलेगो कंपनीच्या ई-स्कूटरला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या आगीत चार दुचाकी, एक चारचाकी वाहन, सोसायटीतील विद्युत मीटर, वायरिंग आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीच्या पार्किंगमध्ये एलेगो कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंगसाठी लावण्यात आली होती. चार्जिंग सुरू असतानाच वाहनातून धूर निघू लागला आणि काही क्षणांतच दुचाकीने पेट घेतला. आगीची तीव्रता वाढल्याने शेजारी उभ्या असलेल्या चार दुचाकी आणि एका कारलाही आगीने वेढले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.
आगीमुळे सोसायटीच्या विद्युत यंत्रणेलाही मोठा फटका बसला. अनेक इलेक्ट्रिक मीटर, वायरिंग आणि अन्य साहित्य जळून नुकसान झाले. घाबरलेल्या रहिवाशांनी तातडीने घराबाहेर पडत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.
घटनेची माहिती मिळताच बारामती नगरपरिषदेचे अग्निशमन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्रभारी सहाय्यक अग्निशमन अधिकारी निखिल कागडा यांच्या नेतृत्वाखाली फायरमन उमेश लालबिगे, वाहन चालक राजेंद्र मिरगुंडे तसेच मदतनीस बळवंत झुंज आणि सुशील सोनवणे यांनी तत्परतेने कार्यवाही करत आग यशस्वीरित्या आटोक्यात आणली.
दरम्यान, महावितरणचे कर्मचारी अभिजीत गायकवाड आणि राहुल बिचकुले यांनी प्रसंगावधान राखत तातडीने विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे आग आणखी पसरून मोठी जीवितहानी किंवा व्यापक नुकसान होण्याची शक्यता टळली. त्यांच्या तत्परतेचे सोसायटीतील रहिवाशांकडून कौतुक करण्यात येत आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार चार्जिंगदरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.






