कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावात शेतकरी आक्रोश; युवक काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी रोखला
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावात शेतकरी आक्रोश; युवक काँग्रेसचा मोर्चा पोलिसांनी रोखला
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
इंदापूर; प्रतिनिधी
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे पुणे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मात्र, आंदोलकांना कृषिमंत्री भरणे यांच्या निवासस्थानाकडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी अडवत मोर्चा रोखल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मोर्चेकऱ्यांना भरणे यांच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर थांबवण्यात आले असून निवासस्थानाकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
अवकाळी पाऊस, गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर नव्हे तर थेट दोन लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आंदोलकांनी केली. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करावा अशीही जोरदार मागणी करण्यात आली.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा देण्यात यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला.
कृषिमंत्र्यांच्या गावातच सरकारविरोधी आंदोलन उभे राहिल्याने या मोर्चाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून शेतकरी प्रश्नांवरून सरकार आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.






