बुद्धिबळाचा पट समोर येताच शरद पवारांनी बरोबर ‘राजा ‘अन् ‘ वजीरावर’थेट हात, बारामतीमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
काही क्षणांतच खेळलेली चाल

बुद्धिबळाचा पट समोर येताच शरद पवारांनी बरोबर ‘राजा ‘अन् ‘ वजीरावर’थेट हात, बारामतीमधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
काही क्षणांतच खेळलेली चाल
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय डावपेचांची चर्चा कायम असते. मात्र, यावेळी त्यांच्या राजकीय खेळीची नव्हे, तर बुद्धिबळाच्या पटावरील एका सहज चालीची चर्चा रंगली आहे. बारामती दौऱ्यादरम्यान सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला दिलेल्या भेटीत विद्यार्थिनीने त्यांच्यासमोर बुद्धिबळाचा पट मांडला आणि पवारांनी काही क्षणांतच खेळलेली चाल आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
बारामतीकडे जात असताना शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी सुपे येथील विद्या प्रतिष्ठानच्या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत शाळेतील शैक्षणिक, क्रीडा आणि सहशालेय उपक्रमांची माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी शाळेकडून होत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
भेटीदरम्यान एका विद्यार्थिनीने शरद पवार यांच्यासमोर बुद्धिबळाचा पट ठेवला. पटावरील मोहरे काही क्षण निरखल्यानंतर त्यांनी राजा आणि वजीराच्या खेळीशी संबंधित एक अचूक चाल खेळली. उपस्थितांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि काही वेळातच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. राजकीय डावपेचांप्रमाणेच बुद्धिबळाच्या पटावरही पवारांनी दाखविलेल्या चातुर्याची चर्चा रंगू लागली.
या भेटीनंतर शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचा आनंद व्यक्त केला. अभ्यासक्रमासोबत विविधांगी उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्यांचा आणि सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी शाळा प्रभावीपणे कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थिनींचा सक्रिय सहभाग आणि नेतृत्व पाहून समाधान वाटल्याचे त्यांनी सांगितले.
बदलत्या काळातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली विचारक्षमता, सृजनशीलता आणि आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत असल्याचे पाहून आनंद झाल्याचे पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतानाच शिक्षणातून नेतृत्व घडविण्याच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
राजकीय पटावरील अचूक डावपेचांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शरद पवार यांनी बुद्धिबळाच्या पटावरही दाखविलेल्या या सहज खेळीमुळे ‘राजकारणातील चाणक्य’ ही त्यांची प्रतिमा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत असून, “राजकीय पट असो किंवा बुद्धिबळाचा, चाल मात्र पवारांचीच!” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहेत.






