स्थानिक

शेळ्यांवर हल्ल्यानंतर आता मानवी वस्तीकडे बिबट्यांची वाटचाल; बारामती तालुक्यातील खांडज ग्रामपंचायत आक्रमक

रात्रीच्या लोडशेडिंगचा बिबट्यांना फायदा?

शेळ्यांवर हल्ल्यानंतर आता मानवी वस्तीकडे बिबट्यांची वाटचाल; बारामती तालुक्यातील खांडज ग्रामपंचायत आक्रमक

रात्रीच्या लोडशेडिंगचा बिबट्यांना फायदा?

बारामती वार्तापत्र

बारामती — तालुक्यातील खांडज गाव परिसरात गेल्या दोन वर्षांपासून बिबट्यांचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यात अनेक शेळ्या व इतर पाळीव जनावरे दगावल्याच्या घटना घडल्यानंतर आता बिबटे थेट मानवी वस्तीलगत दिसू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खांडज ग्रामपंचायतीने वनविभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि महावितरण कंपनीकडे तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
खांडज
ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनानुसार, गाव आणि शेत परिसरात बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत असून महिला, लहान मुले, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सायंकाळनंतर नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री शेतात जाणेही टाळल्याचे सांगितले आहे.
ग्रामीण भागात रात्री होणाऱ्या नियमित वीज भारनियमनामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडतो. या अंधाराचा फायदा घेत बिबटे गावालगत मुक्तपणे फिरत असल्याने मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत रणजित धुमाळ आणि नितीन आटोळे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तातडीच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित केली आहे.

वनविभागामार्फत तात्काळ पिंजरे लावून गस्त वाढविण्याची, पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी आवश्यक समन्वय ठेवण्याची, तसेच महावितरणने रात्रीचे नियमित लोडशेडिंग तातडीने बंद करून अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. याशिवाय वनविभाग, महसूल, पोलीस प्रशासन आणि महावितरण यांनी संयुक्त पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कृती आराखडा राबवावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Back to top button