बारामतीचा जीएसटी क्षेत्रातील आवाज पुन्हा बुलंद; विभागीय समितीवर तिघांची निवड
जामदार, सोमाणी, दोशींवर पुन्हा जबाबदारी!

बारामतीचा जीएसटी क्षेत्रातील आवाज पुन्हा बुलंद; विभागीय समितीवर तिघांची निवड
जामदार, सोमाणी, दोशींवर पुन्हा जबाबदारी!
बारामती वार्तापत्र
वस्तू व सेवाकर विभागाच्या पुणे विभागांतर्गत ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी (Grievance Redressal Committee, Pune Zone) वर बारामतीतील तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुढील दोन वर्षांसाठी फेरनिवड करण्यात आली आहे. बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी आणि बारामती मर्चंट असोसिएशनचे सचिव निलेश दोशी यांचा समितीवर पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
या फेरनिवडीची माहिती केंद्रीय जीएसटीचे उपआयुक्त धिरज मोरे यांनी पत्राद्वारे दिली आहे.
केंद्रीय वस्तू व सेवाकर पुणे मुख्य आयुक्त नीरज कंसल (आयआरएस) आणि राज्य वस्तू व सेवाकर विभागाचे आयुक्त आशिष शर्मा (आयएएस) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. समितीत बारामतीतील या तिघांसह कोल्हापूर व सोलापूर येथील उद्योग-व्यावसायिक प्रतिनिधी, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, टॅक्स प्रॅक्टिशनर्स, कंपनी सेक्रेटरी, कस्टम हाऊस, खाद्यतेल क्षेत्र, व्यापारी महासंघ, टाटा मोटर्स तसेच जीएसटी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
केंद्रीय जीएसटी अंतर्गत पुणे-१, पुणे-२ आणि कोल्हापूर आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र या समितीच्या कार्यकक्षेत येणार आहे.
जीएसटी करदात्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा अभ्यास करून त्यांचे निराकरण करणे, करप्रणालीतील प्रक्रियात्मक अडथळे दूर करणे, सॉफ्टवेअरशी संबंधित समस्या सोडविणे तसेच करदात्यांना अडचणीचे ठरणारे कायदे, नियम, अटी व परिपत्रकांबाबत संबंधित विभागाच्या निदर्शनास बाबी आणून त्यात आवश्यक सुधारणा करण्यासाठी शिफारस करणे, अशी महत्त्वाची जबाबदारी या समितीवर आहे.
२०१७ मध्ये जीएसटी करप्रणाली लागू झाल्यापासून तिच्या अंमलबजावणीबाबत करदात्यांना विविध प्रश्न व अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती परिसरातील जीएसटी करदात्यांनी आपल्या समस्या, सूचना व अडचणी समितीच्या सदस्यांपर्यंत पोहोचवाव्यात. त्या सोडविण्यासाठी समितीच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असे धनंजय जामदार, सुशीलकुमार सोमाणी व निलेश दोशी यांनी आवाहन केले आहे.






