अवैध दारू वाहतुकीला माळेगाव पोलिसांचा दणका; कार-मोटारसायकलसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
गोपनीय माहिती मिळाली अन् पोलिसांनी सापळा रचला

अवैध दारू वाहतुकीला माळेगाव पोलिसांचा दणका; कार-मोटारसायकलसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
गोपनीय माहिती मिळाली अन् पोलिसांनी सापळा रचला
बारामती वार्तापत्र
माळेगाव पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीविरोधात धडाकेबाज कारवाई करत तब्बल ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून देशी दारू, गावठी हातभट्टीची दारू, एक अल्टो कार आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांना गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी आणली जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कऱ्हावागज चौक परिसरात सापळा रचला.
दरम्यान, संशयित मोटारसायकल आणि त्यानंतर आलेल्या अल्टो कारवर पोलिसांनी लक्ष ठेवले. दारूचा व्यवहार सुरू होताच पोलिसांनी छापा टाकून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे शेखर श्रीरंग पवार (रा. राजापूर-दानेवाडी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) आणि कैलास शंकर गव्हाणे (रा. माळेगाव बु., ता. बारामती, जि. पुणे) अशी असल्याचे समोर आले.
झडतीदरम्यान पोलिसांना ३३ बॉक्स देशी दारू, गावठी हातभट्टीची दारू असलेले दोन ड्रम, एक मारुती सुझुकी अल्टो कार आणि एक मोटारसायकल, असा एकूण ४ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दानेवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे जाऊन गावठी हातभट्टीची दारू तयार करणारी भट्टीही उद्ध्वस्त केली.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत. माळेगाव पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, अवैध धंद्यांविरोधातील कारवाई आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.






