स्थानिक

३७ वर्षांची अविरत सेवा… तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अभिनंदन शहा यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

ग्रंथालय परिचर ते रजिस्ट्रार… ३७ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास!

३७ वर्षांची अविरत सेवा… तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अभिनंदन शहा यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

ग्रंथालय परिचर ते रजिस्ट्रार… ३७ वर्षांचा प्रेरणादायी प्रवास!

बारामती वार्तापत्र 

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर) होते, तर संस्थेचे सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात जवाहर शाह यांनी अभिनंदन शहा यांच्या कार्याचे कौतुक केले. “संस्थेच्या कामांमध्ये अभिनंदन शहा यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी उत्तम काम केले,” असे सांगत त्यांनी शहा यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख पाहुणे मिलिंद शाह यांनीही अभिनंदन शहा यांच्या कार्याचा गौरव केला. संस्था व महाविद्यालयाच्या विकासकामांसाठी रजिस्ट्रार पदावरून त्यांनी केलेले काम अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी स्वागत व प्रास्ताविकातून अभिनंदन शहा यांच्या कार्याचा आढावा घेतला. ग्रंथालय परिचर म्हणून सुरू झालेला प्रवास प्रबंधक व रजिस्ट्रार पदापर्यंत कसा पोहोचला, याचा उल्लेख करत त्यांनी महाविद्यालयासाठी शहा यांनी दिलेले योगदान अधोरेखित केले.

संस्थेचे सन्माननीय खजिनदार विकास शहा (लेंगरेकर) यांनी सांगितले की, अभिनंदन शहा यांनी रजिस्ट्रार पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळण्याबरोबरच कॉलेज ऑफ फार्मसी, अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या कामकाजातही योगदान दिले.

भावनिक मनोगतातून आठवणींना उजाळा
सेवापूर्ती सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना अभिनंदन शहा यांनी आपल्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला.

महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ‘कमवा व शिका’ योजनेत काम करून शिक्षण पूर्ण केले आणि त्याच संस्थेत पुढे रजिस्ट्रार पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास घडला, असे त्यांनी सांगितले.

“अनेकान्त एज्युकेशन सोसायटी आणि महाविद्यालयामुळे मी घडलो,” अशी कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनोगते व्यक्त करत अभिनंदन शहा यांच्या कार्याच्या आठवणी सांगितल्या आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे सदस्य चंद्रवदन शहा (मुंबईकर), डॉ. हर्षवर्धन व्होरा, डॉ. महावीर अक्कोळे, अभिजित अडदंडे, सत्यजित शहा, राहुल शहा, अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. धनंजय बागुल, अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या प्रणाली वडेर, कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. दर्शन शहा यांच्यासह संस्थेचे सदस्य, अभिनंदन शहा यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार उपस्थित होते.

तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालय, म्हसवडचे प्राचार्य डॉ. विकास काकडे, बाळासाहेब देसाई महाविद्यालय, पाटणचे प्राचार्य डॉ. रामचंद्र सपकळ, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेक बळे यांनी केले.

Back to top button