देशभक्तीची ज्योत आणि गांधीवादी विचारांचा जागर… निलेशभई कोठारी सन्मानित
३ क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान

देशभक्तीची ज्योत आणि गांधीवादी विचारांचा जागर… निलेशभई कोठारी सन्मानित
३ क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना तसेच बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेच्या माध्यमातून देशभक्ती आणि गांधीवादी विचारांची ज्योत जागृत ठेवत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निलेशभई कोठारी यांचा ‘देशभक्त गौरव’ करून सन्मान करण्यात आला.
रीस्टार्ट एंटरटेनमेंट ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर तसेच मराठी व हिंदी पावसाळी गीतांच्या कराओके ऑर्केस्ट्रा कार्यक्रमात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
यावेळी स्वातंत्र्य सैनिक संघटनेत गांधीवादी विचार आणि देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत निलेशभई कोठारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय विद्यमान नगरसेवक व दि मुस्लिम बँकेचे संचालक आलताफ सय्यद, सांस्कृतिक क्षेत्रातील अकबर शेख तसेच भारतीय संविधान चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन रणपिसे यांचाही गौरव करण्यात आला.
स्वातंत्र्यलढ्याचा वारसा जपणारे कोठारी कुटुंब
यावेळी कोठारी कुटुंबाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. कोठारी कुटुंबाचे स्वातंत्र्य मिळविण्यात मोठे योगदान असून, त्यामध्ये विलासभई कोठारी यांचे योगदान विशेष असल्याचे नमूद करण्यात आले.
या कुटुंबाचा गांधीवादी विचारांचा वारसा निलेशभई कोठारी यांनी पुढे नेला असून, अशा कुटुंबातील व्यक्तीचा सन्मान केल्याबद्दल रीस्टार्ट एंटरटेनमेंट ग्रुपचे अभिनंदन करण्यात आले. तसेच सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्यातून योगदान देणाऱ्या सर्व मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमास रीस्टार्ट एंटरटेनमेंटचे अध्यक्ष समीर पठाण, ॲकॉर्डियन वादक तज्ज्ञ नितीन दोशी, ॲड. नंदकुमार भागवत, पत्रकार तैनुर शेख, श्री. लोंढे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ नाळे यांनी केले.






