बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा!अजितदादांना आवडलेली प्रकाशयोजना आता जगालाही भावली; नेहा दोशींना अमेरिकेचा पुरस्कार
नऊ जागतिक विजेत्यांमध्ये एकमेव भारतीय!

बारामतीच्या शिरपेचात मानाचा तुरा!अजितदादांना आवडलेली प्रकाशयोजना आता जगालाही भावली; नेहा दोशींना अमेरिकेचा पुरस्कार
काशिविश्वेश्वर पुलाची प्रकाशयोजना ठरली ‘जागतिक दर्जाची’
नऊ जागतिक विजेत्यांमध्ये एकमेव भारतीय!
बारामती वार्तापत्र
बारामतीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या काशिविश्वेश्वर पुलावरील आकर्षक प्रकाशयोजनेची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. बारामतीच्या कन्या नेहा राजकुमार दोशी यांनी साकारलेल्या ‘Canopy of Lights’ या प्रकल्पाला अमेरिकेतील Light Justice Now अंतर्गत प्रतिष्ठेचा ‘Award of Merit’ पुरस्कार मिळाला आहे.
जागतिक स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या नऊ जणांमध्ये नेहा दोशी या एकमेव भारतीय ठरल्या आहेत. १४ ऑगस्ट रोजी अमेरिकेत झालेल्या कार्यक्रमात त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
✨ बारामतीच्या पुलाची प्रकाशयोजना ठरली जागतिक दर्जाची
क-हा नदीला येणारा पूर आणि वाहतुकीची गरज लक्षात घेऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून कसबा ते श्रीमंत बाबूजी नाईक वाडा यांना जोडणारा नवीन पूल साकारण्यात आला. या पुलावर वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशयोजना करण्याची जबाबदारी नेहा दोशी यांच्याकडे सोपविण्यात आली होती.
नेहा यांनी पुलासाठी वापरण्यात आलेल्या दिव्यांचे स्वतः डिझाईन करून त्यांची निर्मिती करून घेतली. या अनोख्या संकल्पनेला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकाशयोजना क्षेत्रातील तज्ज्ञांचीही मान्यता मिळाली आहे.
नेहा यांच्या या प्रकल्पाची Light Justice Nowच्या संकेतस्थळावर नोंद झाली असून, Designing Lighting या आंतरराष्ट्रीय प्रकाशयोजना विषयक प्रकाशनातही बारामतीच्या काशिविश्वेश्वर पुलावरील या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकाशयोजनेचे वैशिष्ट्य दिवंगत अजित पवार यांनाही आवडले होते. बारामतीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या कामाला आता जागतिक पुरस्काराची मोहोर मिळाल्याने बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
🎓 बारामतीतून शिक्षण, आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी
नेहा दोशी यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर येथे शालेय शिक्षण, तर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कमिन्समधून आर्किटेक्चरचे शिक्षण घेत त्यांनी दुबई येथे Lighting Design क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविले.
बारामतीच्या एका स्थानिक प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने नेहा दोशी यांच्या यशाचे शहरातून कौतुक होत आहे.






