क्राईम रिपोर्ट

गोपनीय माहिती मिळताच बारामती पोलिसांची धडक कारवाई! दोन जर्सी गायींची सुटका; ₹2.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

पशुवैद्यकीय प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रांचा अभाव

गोपनीय माहिती मिळताच बारामती पोलिसांची धडक कारवाई! दोन जर्सी गायींची सुटका; ₹2.50 लाखांचा मुद्देमाल जप्त

पशुवैद्यकीय प्रमाणपत्रासह आवश्यक कागदपत्रांचा अभाव

बारामती वार्तापत्र

गोवंश जनावरांची संशयास्पद व नियमबाह्य वाहतूक रोखण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. मॅकडॉल कंपनीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर महिंद्रा पिकअपमधून दोन जर्सी गायींची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी दोन गायी आढळून आल्या.

वाहनचालकाकडे गायींची मालकी, खरेदी-विक्री, वाहतुकीचा उद्देश व अंतिम गंतव्य याबाबत समाधानकारक माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. तसेच जनावरांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या पाणी, चारा व इतर व्यवस्थांबाबतही नियमांचे पालन झाले नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महिंद्रा पिकअप वाहन व दोन जर्सी गायी असा एकूण ₹2.50 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही जनावरांची पशुवैद्यकीय तपासणी करून त्यांच्या सुरक्षित देखभालीसाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली.

याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 362/2026 अन्वये प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, 1960 मधील कलम 11(1)(d) तसेच Transport of Animals Rules, 1978 मधील संबंधित नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

गोवंश रक्षकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे करीत आहेत.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जनावरांची संशयास्पद किंवा नियमबाह्य वाहतूक आढळल्यास कायदा हातात न घेता तात्काळ पोलिसांना किंवा डायल 112 वर माहिती द्यावी.

Back to top button