“गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय”
महिला-पुरुष गोविंदांच्या दमदार कामगिरीने उत्साहाला उधाण; लोकनेते प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराचा भव्य सोहळा

“गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय”
महिला-पुरुष गोविंदांच्या दमदार कामगिरीने उत्साहाला उधाण; लोकनेते प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराचा भव्य सोहळा
इंदापूर, –
ढोल-ताशांचा कडकडाट… गोविंदांच्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण… दहीहंडी फोडण्यासाठी उंचच उंच मानवी मनोरे रचताना गोविंदांचा थरार… आणि हा क्षण डोळ्यांत साठविण्यासाठी लोटलेला जनसागर… अशा उत्साहपूर्ण वातावरणात लोकनेते प्रदीपदादा गारटकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव सोहळा इंदापूर शहरात दिमाखात पार पडला. महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र दहीहंडीचे आयोजन हे या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले.
इंदापूर तालुक्यातील आतापर्यंतच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठी गर्दी खेचणाऱ्या सोहळ्यांमध्ये या दहीहंडी उत्सवाची नोंद झाली. सायंकाळपासूनच नागरिकांची कार्यक्रमस्थळी गर्दी वाढत गेल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ढोल-ताशांचा निनाद, गोविंदा पथकांचा उत्साह आणि उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर भारावून गेला.

महिला गोविंदांचा थरार
उत्सवाचे विशेष आकर्षण ठरलेल्या पार्ले (मुंबई) येथील महिला दहीहंडी संघाने दमदार कामगिरी करत महिलांची दहीहंडी फोडली. महिलांनी सादर केलेल्या थरारक मानवी मनोऱ्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. विजेत्या महिला संघाला १ लाख २१ हजार रुपये आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

व्यंकटेश संघाची बाजी
या दहीहंडी सोहळ्यात व्यंकटेश दहीहंडी संघ, महात्मा फुले दहीहंडी संघ आणि इंद्रेश्वर दहीहंडी संघ सहभागी झाले होते. गोविंदांच्या कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या या थरारक सामन्यात व्यंकटेश दहीहंडी संघाने सात थर रचत दहीहंडी फोडत बाजी मारली. विजेत्या संघाला १ लाख ११ हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात आले. सहभागी संघांना प्रत्येकी ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
एकाच व्यासपीठावर राजकीय नेत्यांची मांदियाळी
दहीहंडीच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले, हेही सोहळ्याचे ठळक वैशिष्ट्य ठरले. राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मोहोळ तालुक्याचे माजी आमदार यशवंतराव माने, भाजपचे युवा नेते प्रवीण माने, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विलास वाघमोडे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील, कार्याध्यक्ष अमोल भिसे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, संस्थांचे अध्यक्ष व पदाधिकारी, सरपंच, माजी सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्सवातून एकोप्याचा संदेश
दहीहंडी हा केवळ मनोरंजनाचा उत्सव न राहता परंपरा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक जिव्हाळ्याचे प्रतीक ठरावा, या भावनेतून सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला आणि पुरुष गोविंदा पथकांचा उत्साह, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि विविध राजकीय विचारांचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने या उत्सवाला विशेष रंगत आली. गोविंदांच्या थराराने आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने इंदापूरच्या दहीहंडी उत्सवाने यंदा वेगळीच उंची गाठली.






