‘तडीपार’ असूनही बारामतीत एन्ट्री! फॉर्च्युनरच्या व्हिडिओने खळबळ; पोलिसांनी स्वतःहून घेतली दखल

‘तडीपार’ असूनही बारामतीत एन्ट्री! फॉर्च्युनरच्या व्हिडिओने खळबळ; पोलिसांनी स्वतःहून घेतली दखल
Instagram व्हिडिओ ठरला पुरावा
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असतानाच तडीपार असलेल्या अक्षय उर्फ सोन्या भिमराव कांबळे याचा फॉर्च्युनरमधून दहशत निर्माण करण्याचा कथित प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओची बारामती शहर पोलिसांनी स्वतःहून दखल घेत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता Instagramवरील एका अकाउंटवर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये Toyota Fortuner (MH-42-BN-9786) या वाहनातून काही इसम सार्वजनिक रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. यातील काही जण वाहनाच्या टपावर तसेच बाहेरील भागावर बसलेले असून नागरिकांकडे हातवारे करीत असल्याचे पोलिसांच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले.
व्हिडिओची पडताळणी केली असता त्यामध्ये अक्षय उर्फ सोन्या कांबळे असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधित आरोपीला सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशाने २४ महिन्यांसाठी पुणे जिल्हा, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची हद्द तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका या क्षेत्रातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीची मुदत १८ जानेवारी २०२५ ते १७ जानेवारी २०२७ अशी आहे.
⚡ तक्रारीची वाट न पाहता पोलिसांची कारवाई
या प्रकाराची माहिती समोर येताच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी तात्काळ दखल घेतली. सोशल मीडिया व्हिडिओ, आरोपींची ओळख आणि उपलब्ध डिजिटल पुराव्यांची पडताळणी करून कायदेशीर कारवाईच्या सूचना तपास पथकाला देण्यात आल्या.
पोलिस शिपाई गिरीश नेवसे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३७२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, २८५ तसेच मोटार वाहन अधिनियम कलम १२३(१), १२३(२), १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तडीपार आदेशाच्या उल्लंघनाबाबतही लागू कायदेशीर तरतुदींनुसार स्वतंत्र कारवाई करण्यात येत आहे.
👮♂️ तडीपार आरोपींच्या चेकिंगला वेग
या घटनेनंतर बारामती शहर पोलिसांनी तडीपार आरोपींच्या हालचाली तपासण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे. गोपनीय बातमीदार, पेट्रोलिंग, ज्ञात ठिकाणे तसेच उपलब्ध कायदेशीर आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तडीपार आरोपी प्रतिबंधित क्षेत्रात परतले आहेत का, याची पडताळणी केली जाणार आहे.
पोलिसांच्या अभिलेखानुसार विशेष निगराणीखाली असलेल्या तडीपार व्यक्तींमध्ये धीरज रविंद्र पडकर, अमोल भिमराव कांबळे, तुषार उर्फ चिंट्या मारुती सोनवणे, अक्षय उर्फ सोन्या भिमराव कांबळे, वैभव बगाडे, अक्षय सोनवणे आणि निलेश उमरदंड यांचा समावेश असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
📢 पोलिसांचे नागरिकांना आवाहन
तडीपार आरोपी दिसल्यास नागरिकांनी स्वतः वाद घालू नये, पाठलाग करू नये किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा आणि आरोपी कुठे दिसला, कोणत्या वाहनातून आला किंवा कोणासोबत आहे, एवढी माहिती पोलिसांना द्यावी.
“माहिती तुमची, गोपनीयता आमची, कारवाई बारामती शहर पोलिसांची.” असा स्पष्ट संदेश पोलिसांनी दिला आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत इंगवले यांच्यासह तपास पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास शशिकांत इंगवले करीत आहेत.






