एसीबीचा सापळा अन् खाकीचा खेळ खल्लास! पाच लाखांची लाच घेताना हवालदार बारामतीत पकडला
दोन लाख आधीच घेतले, पाच लाखांसाठी पुन्हा हात पुढे केला

एसीबीचा सापळा अन् खाकीचा खेळ खल्लास! पाच लाखांची लाच घेताना हवालदार बारामतीत पकडला
दोन लाख आधीच घेतले, पाच लाखांसाठी पुन्हा हात पुढे केला
बारामती वार्तापत्र
बारामतीत पोलिस दलाला हादरवणारी कारवाई समोर आली आहे. कारवाई न करण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असलेला बारामती तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार महेश अंकुश उगले (३६) याला ₹५ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने रंगेहात पकडले.
मंगळवारी (दि. ८) दुपारी ३.०२ वाजता माळेगाव रोडवरील पी.डी.सी.सी. बँकेजवळ ही कारवाई करण्यात आली.
तक्रारदाराच्या पत्नीचा झुंबा डान्स क्लास आणि जिम असून, त्यासंदर्भात नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची चौकशी हवालदार उगले याच्याकडे होती. या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी सात लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार ७ सप्टेंबर रोजी एसीबीकडे करण्यात आली होती.
एसीबीच्या पडताळणीत दोन लाख रुपये स्वीकारल्याचे आणि उर्वरित पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पाच लाख रुपये स्वीकारताना उगले एसीबीच्या जाळ्यात अडकला.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
🔥 ‘एकटा’ हवालदार की आणखी कोण? चर्चेला उधाण!
दरम्यान, या प्रकरणात अन्य लोकांचा सहभाग असल्याचे बोलले जात असल्याने तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
या कारवाईमुळे बारामती तालुका पोलिस ठाण्यात खळबळ उडाली असून, लाचखोरीच्या या प्रकरणामागे आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक संतोष पाटील आणि उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पथकाने केली.







