स्थानिक

बारामती तालुका पोलिसांचा गणेश मंडळांना स्पष्ट इशारा; शांतता-सुरक्षिततेसाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन

“डीजे वाजवला तर गुन्हा अन् डीजे जप्त!”

बारामती तालुका पोलिसांचा गणेश मंडळांना स्पष्ट इशारा; शांतता-सुरक्षिततेसाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन

“डीजे वाजवला तर गुन्हा अन् डीजे जप्त!”

दहा दिवस उत्सवाचे, पण शिस्तीचेही; समाजोपयोगी उपक्रम राबवा, पोलिसांना सहकार्य करा

बारामती वार्तापत्र

यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा, यासाठी बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिक, गणेश मंडळे, कार्यकर्ते तसेच डीजे चालकांना आवश्यक नियमांचे पालन करण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नारायण पवार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन केले आहे.

गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी कार्यक्रम शांततेत आणि योग्य पद्धतीने पार पाडावा. गणपती प्रतिष्ठापनेनंतरच्या दहा दिवसांत मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे, तसेच कोणत्याही प्रकारे शांतता भंग होईल, असा कार्यक्रम आयोजित करू नये, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

🔴 सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर नको!

गणेशोत्सवाच्या काळात पोस्टर्स, बॅनर्स तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह किंवा समाजात तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसारित होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. उत्सवाच्या दहा दिवसांत शांतता व कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

🚨 मिरवणुकीत डीजेला स्पष्ट नकार!

गणेश विसर्जनासह विविध मिरवणुकांच्या वेळी वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. मिरवणुकांमध्ये डीजेचा वापर करू नये. नियमांचे उल्लंघन करून डीजेचा वापर करणाऱ्यांवर ध्वनी प्रदूषणासंबंधी कायदे व इतर प्रचलित कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असून, संबंधित डीजे उपकरणे जप्त केली जाऊ शकतात, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

त्यामुळे डीजे चालकांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. कार्यक्रमांमध्ये पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे किंवा बँजोचा वापर करावा. आवश्यकतेनुसार परवानगी असलेल्या मर्यादित साऊंडचा वापर करून कायदेशीर मार्गानेच उत्सव साजरा करावा, असे पोलिसांनी सांगितले.

🌊 विसर्जन घाटावर विशेष दक्षता

गणेश विसर्जनाच्या वेळी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोहता येत नसलेल्या व्यक्तींनी पाण्यात उतरू नये. विसर्जन घाटावर गर्दीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी आणि पाण्यात बुडण्यासारखी दुर्घटना घडणार नाही, यासाठी सर्वांनी दक्ष राहावे.

याशिवाय गणेशोत्सवातील मिरवणुकीदरम्यान ट्रॅक्टर-ट्रॉली, विद्युत रोषणाई, वायरिंग तसेच पाण्याच्या ठिकाणी अपघात होणार नाहीत, याचीही मंडळांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.

“गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. तो शांततेत, सुरक्षिततेत आणि कायद्याच्या चौकटीत पार पाडण्यासाठी सर्व नागरिक व गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करावे,” असे आवाहन बारामती तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नारायण पवार यांनी केले आहे.

Back to top button