केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा! राजू शेट्टी यांचे बारामतीतील माळेगावातून रणशिंग
साखरेची एमएसपी ३१०० वरून ५००० रुपये प्रतिक्विंटल करण्याची मागणी; इथेनॉलचा दर ७० रुपये प्रतिलिटर करण्यासाठी काटा बंद आंदोलन

केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा! राजू शेट्टी यांचे बारामतीतील माळेगावातून रणशिंग
साखरेची एमएसपी ३१०० वरून ५००० रुपये प्रतिक्विंटल करण्याची मागणी; इथेनॉलचा दर ७० रुपये प्रतिलिटर करण्यासाठी काटा बंद आंदोलन
बारामती वार्तापत्र
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपयांपर्यंत दर मिळवून देण्यासाठी साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) आणि इथेनॉलच्या खरेदी दरात वाढ करणे आवश्यक आहे. मात्र, केंद्र सरकार वारंवार ऊसाच्या रास्त व किफायतशीर दरात (एफआरपी) वाढ करत असले, तरी साखरेची एमएसपी वाढवण्याबाबत निर्णय घेत नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
“साखरेचे उत्पादन बंद करा, कारखान्यांचे काटे बंद ठेवा; तरच केंद्र सरकारचे डोळे उघडतील!” अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी माळेगाव येथून राज्यातील साखर कारखानदारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर साखरेची एमएसपी आणि इथेनॉलच्या दरवाढीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
साखरेची एमएसपी ५००० रुपये करा; इथेनॉलला ७० रुपये दर द्या!
केंद्र सरकारने एफआरपीमध्ये वेळोवेळी वाढ केली; मात्र साखरेची किमान विक्री किंमत प्रतिक्विंटल ३१०० रुपयांच्या पुढे नेली नसल्याचा मुद्दा राजू शेट्टी यांनी उपस्थित केला. साखरेच्या उत्पादन खर्चात वाढ होत असताना तिच्या किमान विक्री किमतीतही वाढ होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
साखरेची एमएसपी सध्याच्या ३१०० रुपयांवरून ५००० रुपये प्रतिक्विंटल करावी आणि इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागण्या मान्य झाल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपयांपर्यंत दर देण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार न करता निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत, सरकारने भांडवलदारांच्या हितापेक्षा शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
माळेगाव कारखान्यावर काटा बंद आंदोलन
माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या चालू ऊस गळीत हंगामाला वेग आला असतानाच राजू शेट्टी यांनी साखरेची एमएसपी आणि इथेनॉलच्या दरवाढीच्या मागणीसाठी कारखान्याच्या कार्यस्थळावर आंदोलन केले.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, दिग्विजय कोकरे, सस्ते, सरगर आदी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी कारखाना प्रशासनाला काटा बंद ठेवण्याचे आवाहन केले.
कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे यांच्यासह काही संचालकांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून राजू शेट्टी यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला. ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, विजय तावरे, शिवराज जाधवराव, चंद्रशेखर जगताप, रतन भोसले, जयपाल देवकाते, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे आणि कार्यालयीन अधीक्षक अनिलकुमार तावरे आदी उपस्थित होते.
“दिवाळीच्या तोंडावर साखरेची टंचाई सरकारला परवडणार नाही!”
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असताना साखर उत्पादन बंद ठेवण्याच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव निर्माण होऊ शकतो, असे राजू शेट्टी यांनी सूचित केले.
ते म्हणाले की, खासगी आणि सहकारी साखर कारखानदारांच्या संघटना अस्तित्वात असतानाही गेल्या सात वर्षांत साखरेच्या एमएसपी वाढीबाबत ठोस निर्णय करून घेण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनाच आता आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधावे लागत आहे.
काही काळासाठी साखरेचे बाजारभाव प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांपेक्षा अधिक झाले होते. मात्र, त्या वाढीचा मोठा फायदा साखर कारखानदारांपेक्षा साठेबाजांना झाल्याचा दावा शेट्टी यांनी केला.
बाजारात स्थिरता निर्माण व्हावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळावा, यासाठी साखर उत्पादन रोखण्याची भूमिका त्यांनी मांडली. सध्याची परिस्थिती ही सरकारवर दबाव आणण्यासाठी योग्य असल्याचे सांगत त्यांनी कारखानदारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
माळेगावच्या शेतकऱ्यांच्या कमी उपस्थितीवरून नाराजी
आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी उपस्थित शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याबद्दल माळेगाव परिसरातील शेतकऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. ऊसदराच्या प्रश्नाचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर होत असताना आंदोलनात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एमएसपी वाढल्यास माळेगावच्या पहिल्या हप्त्यात वाढ?
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन शेंडे यांनीही साखरेच्या एमएसपी वाढीच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. सरकारने साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ केल्यास माळेगाव कारखान्याने जाहीर केलेल्या यंदाच्या ३५०० रुपये प्रतिटन पहिल्या हप्त्यात लक्षणीय वाढ केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
माळेगाव कारखाना नेहमीच एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याचा प्रयत्न करत आला असल्याचे नमूद करत, शेतकऱ्यांना अधिक मोबदला मिळण्यासाठी राजू शेट्टी यांनी मांडलेल्या मागण्यांना कारखान्याचा पाठिंबा राहील, अशी भूमिका शेंडे यांनी व्यक्त केली.
ऊसदराच्या लढ्याला नवे वळण?
साखरेची एमएसपी, इथेनॉलचा खरेदी दर आणि ऊस उत्पादकांना मिळणारा अंतिम दर या तीन प्रमुख मुद्द्यांवरून साखर उद्योगातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे गळीत हंगामाला वेग येत असताना दुसरीकडे कारखाने बंद ठेवण्याच्या आवाहनामुळे सहकार क्षेत्रात नवी चर्चा सुरू झाली आहे.
आता केंद्र सरकार साखरेच्या एमएसपी आणि इथेनॉलच्या दराबाबत कोणती भूमिका घेते, माळेगावसह अन्य साखर कारखाने या आंदोलनाला कितपत पाठिंबा देतात आणि शेतकऱ्यांच्या ऊसदरात प्रत्यक्ष किती वाढ होते, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.
ऊस उत्पादकांना प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी माळेगावातून पुकारलेला लढा आगामी काळात राज्यातील साखर उद्योगासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.






