मोदींचा बारामती दौरा रद्द! आता शरद पवारांच्याच हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; १२ डिसेंबरला काय घडणार?
मोदींची प्रतीक्षा संपली!

मोदींचा बारामती दौरा रद्द! आता शरद पवारांच्याच हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; १२ डिसेंबरला काय घडणार?
मोदींची प्रतीक्षा संपली!
बारामती वार्तापत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित बारामती दौऱ्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी नियोजित असलेला पंतप्रधान मोदी यांचा दौरा तूर्तास रद्द करण्यात आला आहे. आता या वास्तूचे उद्घाटन येत्या १२ डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, या उद्घाटनासाठी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याचे नियोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ३ नोव्हेंबर, त्यानंतर १६ नोव्हेंबर अशा दोन तारखा चर्चेत आल्या; मात्र दोन्ही वेळेस मोदींचा बारामती दौरा प्रत्यक्षात होऊ शकला नाही. आता थेट उद्घाटनाची सूत्रे शरद पवार यांच्या हाती आल्याने या घडामोडीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
मोदींच्या निमंत्रणावरून राजकीय वाद!
पंतप्रधान मोदी यांना बारामतीत निमंत्रित करण्याच्या निर्णयावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. देशभरात एसआयआर (SIR) मुद्द्यावरून इंडिया आघाडी केंद्र सरकारविरोधात भूमिका घेत असताना, याच आघाडीतील प्रमुख नेते शरद पवार मोदींना बारामतीत का बोलावत आहेत, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता. या निमंत्रणावरून पवारांवर टीकाही झाली होती. मात्र, आता मोदींचा प्रस्तावित दौरा रद्द झाल्याने या चर्चांना नवे वळण मिळाले आहे. दौरा रद्द होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक!
दरम्यान, नुकतेच आजारपणातून सावरलेले शरद पवार यांनी २० नोव्हेंबर रोजी सकाळी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानला भेट देत संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, जय पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. गेल्याच महिन्यात जय पवार यांची विद्या प्रतिष्ठानच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
राजकीय चर्चांना पुन्हा उधाण!
मतदारसंघ पुनर्रचना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चा आणि राज्यातील बदलती राजकीय समीकरणे या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील प्रमुख सदस्यांची एकत्रित उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. या बैठकीत संस्थेच्या कामकाजाबरोबरच काही राजकीय विषयांवरही चर्चा झाली का, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
एकीकडे मोदींच्या बहुचर्चित बारामती दौऱ्याला तूर्तास पूर्णविराम, तर दुसरीकडे १२ डिसेंबरला शरद पवारांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन! मोदींच्या निमंत्रणावरून रंगलेल्या राजकीय वादानंतर आता या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






