आपला जिल्हा

अजितदादांचे स्वप्न, सुनेत्रावहिनींचा पुढाकार! बारामतीच्या स्वच्छतेत हायटेक क्रांती; अत्याधुनिक सफाई मशीन सेवेत दाखल!

ताशी ५ ते ६ किलोमीटर रस्त्यांची यांत्रिक स्वच्छता; धूळ प्रदूषणावर नियंत्रणासह मनुष्यबळाचीही होणार बचत!

अजितदादांचे स्वप्न, सुनेत्रावहिनींचा पुढाकार! बारामतीच्या स्वच्छतेत हायटेक क्रांती; अत्याधुनिक सफाई मशीन सेवेत दाखल!

ताशी ५ ते ६ किलोमीटर रस्त्यांची यांत्रिक स्वच्छता; धूळ प्रदूषणावर नियंत्रणासह मनुष्यबळाचीही होणार बचत!

बारामती वार्तापत्र 

स्वर्गीय अजितदादा पवार यांचे स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त बारामतीचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) माध्यमातून उपलब्ध झालेले अत्याधुनिक यांत्रिक स्वच्छता वाहन शनिवारी (२८ नोव्हेंबर) बारामतीत दाखल झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते श्रीराम चौक, भिगवण रोड येथे या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

या अत्याधुनिक वाहनामुळे रस्त्यांची झाडलोट, व्हॅक्यूमद्वारे धूळ व कचरा संकलन, पाण्याच्या उच्च दाबाने रस्त्यांची धुलाई आणि दुभाजकांची स्वच्छता एकाच यंत्रणेद्वारे करता येणार आहे. विशेष म्हणजे, ताशी ५ ते ६ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता शक्य होणार असल्याने कमी वेळेत अधिक परिसर स्वच्छ करता येणार आहे.

वाहनात ६ हजार लिटर पाण्याची टाकी, ७ हजार लिटर स्लज टाकी, ताशी २० हजार घनमीटर क्षमतेची व्हॅक्यूम प्रणाली आणि १५० बार दाबाची पाणी फवारणी यंत्रणा उपलब्ध आहे. पुढील तीन वर्षांसाठी देखभाल-दुरुस्ती आणि आवश्यक मनुष्यबळाची सुविधाही मिळणार असल्याने नगरपरिषदेवरील अतिरिक्त भार कमी होणार आहे.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी स्वच्छता व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देत, बारामतीच्या स्वच्छतेसाठी ही यंत्रणा प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन केले. अजितदादांनी पाहिलेले स्वच्छ आणि सुंदर बारामतीचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमासाठी खासदार पार्थ पवार यांचे सहकार्य लाभले. नगराध्यक्ष सचिन सातव, मुख्याधिकारी पंकज भुसे आणि आरोग्य व स्वच्छता सभापती नवनाथ बल्लाळ यांनीही या यंत्रणेच्या उपलब्धतेसाठी पुढाकार घेतला.

यावेळी उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अजितदादांचे स्वच्छ बारामतीचे स्वप्न आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे!

Back to top button