उद्या पासुन कडक कारवाई, बारामती शहर पोलीसांचा इशारा.
चारचाकी,मोटार सायकलवर होणार कारवाई.
बारामती शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता पोलिसांनी आता दुचाकीवरुन डबलसीट फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे.
गुरुवारपासून (ता. 23) बारामती नगरपालिका व बारामती शहर पोलिसांच्या वतीने विनामास्क व दुचाकीवर डबलसीट फिरणाऱ्यांवर जोरदार कारवाईचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी दिला आहे. दरम्यान चार चाकी वाहनात देखील चालकाव्यतिरिक्त दोनच जणांना प्रवासासाठी परवानगी असेल, त्याहून अधिक लोक चार चाकीमध्ये आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.
हा निर्णय नागरिकांच्या हितासाठीच घेण्यात आला आहे, त्यामुळे सर्वांनी यास सहकार्य करावे, कारवाईची कटुता येणार नाही, या साठी प्रत्येकाने नियमाचे पालन करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एकाच दिवसात 197 जणांवर कारवाई करण्यात आली असल्याचेही शिरगावकर यांनी सांगितले.