गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार.
70 हजारांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार.
गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार.
70 हजारांचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार.
बारामती;वार्तापत्र
शहरात सोनसाखळी चोरांनी पुन्हा एकदा हात साफ करण्यास प्रारंभ केला आहे. गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार घडल्याने महिलांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. शहरातील सहयोग सोसायटीमागील कोहिनूर पार्क या इमारतीच्या पार्किंगमध्ये येत चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावले. याप्रकरणी नीता सुभाष वाबळे यांनी फिर्याद दिली आहे.
संध्याकाळी फिरुन सातच्या सुमारास परत आल्यानंतर कोहिनूर पार्कच्या पार्किंगमध्ये त्या उभ्या असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघे जण मोटारसायकलवरुन आले. सुजाता टीचर येथे कोठे राहतात असे त्यांना विचारले, अशी व्यक्ती येथे राहत नाही, असे सांगितल्यावर एक कागद त्यांनी पुढे केला, तो कागद वाचण्यासाठी त्या पुढे सरकताच क्षणार्धात त्याने त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावून पळ काढला.
दरम्यान, चारच दिवसांपूर्वी शहरातील संघवी पार्कसमोरून संध्याकाळी साडेसात वाजता मोटारसायकलवरुन आलेल्या दोन युवकांनी उमा विजय भोई या महिलेच्या गळ्यातील 70 हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले होते. चार दिवसात मंगळसूत्र चोरीच्या दोन घटना घडल्या असून, जवळपास पावणेदोन लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे.
बारामती शहरात दिवसाची व संध्याकाळची मोटारसायकलवरुन पोलिसांची गस्त सुरु करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. नंबरप्लेट नसलेल्या तसेच संशयास्पद असलेल्या मोटारसायकलस्वारांचीही चौकशीची गरज नागरिक बोलून दाखवित आहेत.