कोव्हिडसारख्या महामारीत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या डाॅक्टरांनाच मारहाण..! हिच का बारामतीकरांची संस्कृती ?
बारामतीत काल रात्री आरोग्य हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यावरून रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत डॉक्टरांना मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोव्हिडसारख्या महामारीत अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या डाॅक्टरांनाच मारहाण..! हिच का बारामतीकरांची संस्कृती ?
बारामतीत काल रात्री आरोग्य हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यावरून रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत डॉक्टरांना मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बारामती वार्तापत्र
या घटनेत बारामतीतील भूलतज्ज्ञ डॉ. सुजीत अडसूळ यांना मारहाण करण्यात आली. ही घटना बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयासमोरील आरोग्य हॉस्पिटलमध्ये घडली. डॉ. राहूल जाधव यांच्या या हॉस्पिटलमध्ये बारामतीतील प्रतिष्ठित व्यावसायिकास उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यामध्ये त्यांची प्रकृती गंभीर होत गेली व रात्री त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एका व्यक्तीने दवाखान्यात प्रवेश करून तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली व डॉ. सुजीत अडसूळ हे समजावण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी डॉ. अडसूळ यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी वरील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आज बारामतीतील डॉक्टरांची बैठक…
काल झालेल्या या प्रकारानंतर बारामतीतील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची आज संध्याकाळी मेडीकोज गिल्ड येथे बैठक होत असून या प्रकाराची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
डॉक्टरांची सुरक्षितता आमची जबाबदारी….
कोरोनाच्या काळात रुग्णांना अथक सेवा देणा-या डॉक्टरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांची आहे. बारामतीतील सोळा खाजगी रुग्णालयांसाठी एक अधिकारी व चार पोलिस कर्मचारी नियुक्त केलेले असून दर एक तासाने हे पथक सर्वच दवाखान्याचा आढावा घेणार आहेत. कोणत्याही दवाखान्यात कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल -औदुंबर पाटील, पोलिस निरिक्षक, बारामती शहर पोलिस ठाणे.
इंदापूरात वेगळ्याच प्रकाराने रुग्णांमध्ये अस्वस्थता
इंदापूर तालुक्यातही रुग्णांचा मृत्यूदर वाढत आहे. मात्र येथे वेगळाच प्रकार सुरू आहे. सरकारी डॉक्टरांमधील वाद येथे विकोपाला गेले आहेत. नुकतीच येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची बदली करून तेथे नव्याने तालुका आरोग्य अधिकारी नेमण्यात आले. मात्र उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांमधील वैयक्तिक वाद वाढू लागल्याने रुग्णांबरोबरच सामाजिक कार्यकर्त्यांचीही अस्वस्थता वाढली आहे. या वादावर त्वरीत तोडगा काढावा, अन्यथा त्याचे परिणाम उपचारावर होण्याची भीती सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.