मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत कोणतीही शासकीय भरती करू नका
बारामतीच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागणी.
मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत कोणतीही शासकीय भरती करू नका.
बारामतीच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मागणी.
बारामती वार्तापत्र
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील दिलेली स्थगिती जोपर्यंत उठवत नाही, तोपर्यंत सरकारने कोणतीही शासकीय भरती करू नये अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामतीत करण्यात आली.
बारामतीच्या प्रांताधिकारी कार्यालयात आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये नमूद केल्यानुसार राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात योग्य पध्दतीने बाजू मांडली नाही. तसेच राज्य सरकारच्या महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील व्यक्तींना माहिती दिली नाही व ते स्वतःही या खटल्यापासून दूर राहीले त्यामुळेच मराठा समाजाच्या आरक्षणास स्थगिती मिळाली आहे असा आरोप या क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान मोर्चाच्या वतीने दिलेल्या निवेदनात यास राज्य सरकार जबाबदार असून शासनाने संपूर्ण प्रयत्न करून तात्काळ स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावेत व स्थगिती उठेपर्यंत कोणतीही भरती करू नये अशी मागणी केली आहे.
यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेल्या निर्णयाच्या दिवसापर्यंत सर्व भरती प्रक्रियेत सर्व जाहीरातीच्या आधारे भरती झालेल्या सर्व मराठा उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घ्या व शैक्षणिक प्रवेश देखील करून घ्यावेत अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
आर्थिक मागास १० टक्के आरक्षणाच्या ज्या सवलती दिल्या आहेत, त्या सवलतींपासून राज्य सरकारने मराठा समाजाला त्याचा लाभ घेता येणार नाही असा अध्यादेश काढला आहे. हा आदेश तात्काळ रद्द करून आर्थिक मागासाच्या सर्व सुविधा मराठा समाजाला द्याव्यात अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर झाले नाही व वरील सूचनांचे पालन केले नाही, तर क्रांती मोर्चा महाराष्ट्रभर कोरोनाचा विचार न करता मोठे आंदोलन करेल असा इशाराही या मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.