कोरोना पेशंट अस्वस्थ आणि नातेवाईक हवालदिल…रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईना…
संबंधित दुकानदारांचे नंबर, त्यांच्याकडे किती इंजेक्शन्स आली, कितीची विक्री झाली व त्यांच्याकडे किती शिल्लक आहेत.
कोरोना पेशंट अस्वस्थ आणि नातेवाईक हवालदिल…रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध होईना…
संबंधित दुकानदारांचे नंबर, त्यांच्याकडे किती इंजेक्शन्स आली, कितीची विक्री झाली व त्यांच्याकडे किती शिल्लक आहेत
बारामती वार्तापत्र
बारामतीत रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन नेमके कोणत्या दुकानात किंवा कोणत्या रुग्णालयात उपलब्ध होईल याची काहीही माहिती नसल्याने नातेवाईक सैरभैर होऊन इंजेक्शन शोधत राहतात. बहुसंख्य ठिकाणी शिल्लक नसल्याचे सांगितले जाते तर रुग्णालयांकडून लवकर इंजेक्शन आणण्याचा तगादा लावला जातो, या मध्ये रुग्णाच्या जिवाला काही बरे वाईट तर होणार नाही ना, या भीतीपोटी नातेवाईकच गलितगात्र होतानाचे चित्र दिसत आहे. काही दुकानात औषध दिल्यानंतर बिलही दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत.
कोरोनासाठी उपयुक्त असलेल्या रेमडीसिवीर या इंजेक्शनचा बारामतीत कमालीचा तुटवडा जाणवत असून रुग्णांच्या नातेवाईकांना त्याचा कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासन स्तरावर या इंजेक्शनबाबत कसलाच समन्वय नसल्याचा फटका लोक सहन करत आहेत. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांसाठी रेमडीसिवीर हे इंजेक्शन महत्वाचे आहे. अनेकांना याचा चांगला फायदा होत आहे. मात्र, राज्यात सगळीकडेच प्रचंड मागणी असल्याने व उत्पादन पुरेसे नसल्याने हे इंजेक्शन मर्यादीत प्रमाणात बारामतीतही उपलब्ध होत आहे. एकीकडे कोरोना पॉझिटीव्ह असले तरच त्यांचा रिपोर्ट व आधार कार्ड घेऊनच हे इंजेक्शन दिले जात आहे, मात्र सारीच्या रुग्णांनाही हे इंजेक्शन दिले जाते, अशा रुग्णांना हे इंजेक्शन मिळवताना कसरत करावी लागत आहे.
समन्वयाचा बोजवारा…..
हे इंजेक्शन रुग्णासाठी महत्वाचे असताना ते कोणत्या दुकानात मिळेल हे रुग्णांच्या नातेवाईकांना समजण्यासाठी कोणतीही यंत्रणाच नाही. संबंधित दुकानदारांचे नंबर, त्यांच्याकडे किती इंजेक्शन्स आली, कितीची विक्री झाली व त्यांच्याकडे किती शिल्लक आहेत, याची माहिती देणारी एखादी हेल्पलाईन का सुरु केली जात नाही असा लोकांचा सवाल आहे.
या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी विजय नांगरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या औषधाचा पुरवठाच कमी होतो आहे, रुग्णांच्या नातेवाईकांना कोणत्या दुकानात औषधे मिळतील याची माहिती देण्यासाठी वरिष्ठांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न होईल.