आता तोंड लपवू नका!; सुशांत प्रकरणी रोहित यांचा भाजप नेत्यांना ‘हा’ सल्ला!
सुशांतसिंह राजपूतची हत्या झाली नसल्याचे एम्सच्या अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तर भाजप नेत्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.
आता तोंड लपवू नका!; सुशांत प्रकरणी रोहित यांचा भाजप नेत्यांना ‘हा’ सल्ला!
नगर: बारामती वार्तापत्र
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ‘एम्स’ चा अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये सुशांतची हत्या झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अहवालाचा आधार घेत कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करीत भाजपवर टीका केली आहे. ‘ज्या लोकांनी आमच्या महाराष्ट्राची आणि पोलिसांची बदनामी केली, त्या सर्व लोकांनी आता तोंड न लपवता जाहीरपणे महाराष्ट्राची आणि पलिसांची बदनामी केल्याबद्दल माफी मागावी,’ अशी मागणीच त्यांनी राज्यातील
भाजप नेत्यांचे नाव न घेता केली आहे. हे ट्विट करताना त्यांनी ‘सत्यमेवजयते’ हा हॅशटॅग सुद्धा वापरला आहे. ( Rohit Pawar Targets BJP in Sushant Singh Rajput Death Case )
सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर मोठ्या प्रमाणात राजकारण झाले. या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप झाले. मुंबई पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पुढे मुंबई पोलिसांकडून हा तपास काढून ‘सीबीआयकडे’कडे सोपवण्यात आला. त्यातच आता ‘एम्स’च्या अहवालावरून जी माहिती समोर येतेय, त्यामध्ये सुशांतची आत्महत्याच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. या अहवालावरून रोहित पवार यांनी भाजपला लक्ष्य केले आहे. ट्वीटरच्या माध्यमातून रोहित पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतलाय.
वाचा: AIIMS चा रिपोर्ट- सुशांतसिंह राजपूतची हत्या नाही तर आत्महत्याच
‘बिहार निवडणुकीसाठी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर ‘एम्स’च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दु:खात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी,’ असेही पवार यांनी स्पष्ट केलेय.
दरम्यान, सुशांत प्रकरणी मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासावर राज्यातील व देशपातळीवरील भाजप नेत्यांनी शंका उपस्थित केली होती. सुशांतच्या मृत्यूच्या बाबतीत एक मोठा जनआक्रोश आहे. काहीतरी लपवलं जात आहे, असं लोकांना वाटतंय. वेगवेगळे खुलासे येताहेत. सातत्यानं मागणी होऊनही सरकार सीबीआय चौकशीला नकार देत आहे’, असे नमूद करत विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, इतकेच आमचे म्हणणे आहे. या प्रकरणात आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. याच्याशी बिहार निवडणुकीचा काहीही संबंध नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने रोहित पवार यांच्या टीकेचा रोख भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे स्पष्टच दिसत आहे.