मोहोळ चे आमदार यशवंत माने यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैध
नागपूर खंडपीठाचा व बुलडाणा जात पडताळणी समितीचा शिक्कामोर्तब
मोहोळ चे आमदार यशवंत माने यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैध
नागपूर खंडपीठाचा व बुलडाणा जात पडताळणी समितीचा शिक्कामोर्तब
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील शेळगाव चे सुपुत्र व सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांच्या विरूध्द मोहोळ येथील शिवसेनेचे सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी जातीचा दाखला व जातवैध प्रमाणपत्र अवैध असल्याची दाखल केलेली याचिका मुबंई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने फेटाळली आहे.त्यामुळे आमदार यशवंत माने यांना मोठा दिलासा मिळून विरोधकांना मोठी चपराक बसली आहे.
तीन वर्षापूर्वी नागपूर खंडपीठाने जात वैधता प्रमाण पत्र संदर्भात वैध असलाचा निर्णय याबाबत दिला असून उच्च न्यायालयाच्या आदेशावर पुननिर्णयाचे अधिकार समितीला नसल्याचे सांगून आ.यशवंत माने यांच्या विरुद्ध केलेला तक्रारी अर्ज बुलडाणा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सचिव बी.यु.खरे,अतिरिक्त जिल्हाधिकारी जी. आर. खरात व उपायुक्त राकेश पायाल यांच्या समितीने ६ नोव्हेंबर २०२० रोजी हा निर्णय घेतला आहे.त्याच्याबरोबरच नागपूर खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती त्याची सुनावणी न्यायाधीश दिपांकर दत्ता व न्यायाधीश झेड ए हक्क यांच्यासमोर झाली.
आ.यशवंत माने यांचे जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचे सांगून त्यांनी शासनाची व अनुसूचित जाती प्रवर्गाची फसवणूक केली असल्याची तक्रार सोमेश नागनाथ क्षीरसागर यांनी ३१ऑगस्ट २०२० रोजी बुलढाणा जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे केली होती. दरम्यान आ.यशवंत माने यांच्या जातीच्या दाखल्याला शेळ्गाव चे विलास भांगे यांनी नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. त्यावेळी न्यायालयाने सादर केलेल्या सर्व पुराव्यांची पडताळणी करुन अकोला,अमरावती,भंडारा,बुलढाणा, नागपूर,वर्धा व यवतमाळ तसेच राजूरा तालुका वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कैकाडी जातीचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जातीच्या प्रचलित यादीत 28 व्या क्रमांकावर असल्याचा पुरावा ग्राह्य धरुन आ.माने यांचा कैकाडी जातीचा दाखला हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी वैध असल्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. आ यशवंत माने यांना जात वैधता प्रमाणपत्र चा दाखल योग्य असल्याचे समितीपुढे निदर्शनास आले आणि समितीने जात पडताळणी अधिनियम २००९ नुसार सोमेश क्षीरसागर यांची तक्रार निकाली काढली आहे. उच्च न्यायालयाच्या विविध न्याय निवाड्यानुसार जात पडताळणी समितीकडे पुननिर्णयाचे अधिकार नसल्याने ही तक्रार निकाली काढण्यात आल्याचे समिती च्या सुत्राने जाहीर केले.
बुलढाणा जिल्हा जात वैधता समितीने दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की,आ.यशवंत माने व त्यांचे मोठे बंधु हनुमंत माने यांनी कैकाडी या जातीचे अनुसूचित जातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळविले असल्याची तक्रार सोमेश क्षीरसागर यांनी केली होती. मात्र, सर्व पुराव्यांची शहानिशा करुन तसेच तीन वर्षांपूर्वी नागपूर खंडपीठाने आ.माने यांचे कैकाडी जात प्रमाणपत्राचे अनुसूचित जात पडताळणी प्रमाणपत्र वैध असल्याच्या निकालाचा संदर्भ देत शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांचा अर्ज निकाली काढत आहोत.