भिमाई आश्रमशाळेत ७१ वा संविधान दिन साजरा
संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन
बारामती वार्तापत्र
इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या वतीने २६ नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व नियमांचे काटेकोरपणे पालन करत साजरा करण्यात आला.
यावेळी प्रा. डी.आर ओहोळ सर यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना रत्नाकर मखरे म्हणाले की, तळागळातल्या माणसांसाठी मी गेली पन्नास वर्षे कार्यरत आहे. दोन पत्र्याच्या खोलीत सुरू केलेली शाळा तो प्रवास इथपर्यंत येऊन ठेपला आहे. माझ्या श्वासात शेवटचा श्वास असे पर्यंत काम चालूच ठेवणार असल्याचे मखरे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डी.आर ओहोळ सर ७१ व्या भारतीय संविधान दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत
आपल्या भाषणात म्हणाले की,जर आपल्याला खरंच संविधान समजून घ्यायचे असेल तर संविधानाची पार्श्वभूमी काय आहे? हे माहित हवं. आपल्याला केवळ संविधान शब्द इथपर्यंतच माहित आहे. ज्यांनी संविधान लिहिले त्यांचा काय उद्देश होता? न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वावर/ आधारावर नवा भारत उभा राहावा हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. मात्र हे उद्देश आज पूर्ण झालेत का? जर हे अपूर्ण असेल तर ती पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची. ज्यांना कोणाला भारतीय संविधान समजून घ्यायचे आहे त्यांनी संविधानाचं वाचन केले पाहिजे आणि ते समजून घेतले पाहिजे अनुदानित आश्रमशाळेला अनुदान मिळण्यासाठी ८२ दिवस बेमुदत धरणे आंदोलन करत उच्च न्यायालयात दाद मागावी लागते. त्याची बातमी होऊन मग न्याय मिळतो. तर मग आपण आज स्वतंत्र आहोत का ? असा प्रश्न उपस्थित करत प्रा.ओहोळ यांनी संविधानाच्या सर्व माहितीचे विस्तृत विवेचन करत प्रत्येक पैलू समजावून सांगितला. बहुजन महापुरुषांचे विचार डोक्यात घ्या. आणि त्यानुसार आपले आचरण वागण्यातून दिसणं हे महत्त्वाचं असल्याचे ओहोळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केलं. प्रा. ओहोळ सर पुढे म्हणाले की,पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. लोकशाहीत पत्रकारांची भूमिका फार मोठी आहे. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांचा आवाज शासन दरबारी पोहचविण्याची जबाबदारी पत्रकारांची असून त्यांना न्याय मिळवून देण्यात पत्रकार आपल्या लेखणीतून महत्त्वाची भूमिका बजावतात.
यावेळी गोरख तिकोटे, भैलुमे काका, संचालक शकुंतला मखरे, अस्मिता मखरे, अनार्या मखरे तसेच प्राचार्या. अनिता साळवे आणि संस्थेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.भिमाई प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार, सविता गोफणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.