आकडा टाकताय खबरदार गुन्हा दाखल होईल.
वीज कंपनीची मोहीम तीव्र,अनेक जणांवर गुन्हे दाखल.
बारामती वार्तापत्र
वीज वितरण कंपनीच्या तारांवर कोणीही,केव्हाही आकडा टाकावा अशी स्थिती लॉकडाऊन पासून सुरू आहे. मात्र खबरदार आता जर तुम्ही आकडा टाकला तर तुमच्यावर थेट गुन्हा दाखल होणार आहे. बारामती परी मंडळांतर्गत यासाठी कारवाई होणार आहे. चोरी हा दखलपात्र गुन्हा आहे त्यामुळे महावितरणच्या बारामती विभागाने आकडे हटवा, कनेक्शन वाढवा ही मोहीम उघडली असून अवघ्या पंधरा दिवसात बारामती व इंदापूर तालुक्यात 1597 वीज चोरांवर धडक कारवाई केली आहे. यातील 356 चोरांनी नवीन कनेक्शन घेतले असून 178 चोरांवर विद्युत कायद्यातील कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
बारामती परिमंडळ चे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील आणि कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांच्या उपस्थितीत भिगवण येथे नुकताच वीज कर्मचाऱ्यांचा मेळावा पार पडला होता. त्यावेळी या अधिकाऱ्यांनी वीज चोरी करणाऱ्या विरोधात मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले होते. यावेळी शाखा अभियंता व वायरमन यांना पंधरा दिवसात पंधराशे वीज चोरांवर कारवाई करून त्यांना कनेक्शन देण्याचे टार्गेट देण्यात आले होते.
इंदापूर तालुक्यात विज चोरांवर कारवाईचा विक्रम करण्यात आला. तालुक्यात 1231 आकडे काढण्यात वीज कंपनीला यश आले त्यापैकी 138 ठिकाणी थकबाकीदार होते. त्यातून 6 लाख बावीस हजार रुपयांची रक्कम वसूल झाली तर 413 जणांना नवीन कनेक्शन साठी कोटेशन देण्यात आले. त्यातील 296 जणांनी पैसे भरून नवीन कनेक्शन घेतले तर 151 चोरांवर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. बारामती तालुक्यात 366 आकडे पकडले त्यातील 76 जणांना कोटेशन दिले 60 नवीन कनेक्शन झाले 17 ठिकाणी 92 हजार रुपयांची जुनी थकबाकी वसूल झाली व 27 जणांवर फौजदारी कारवाई झाली.या कारवाईनंतर जवळपास 32 लाख रुपयांचा महसूल वसूल होईल .
या कारवाईसाठी उपकार्यकारी अभियंता बारामती ग्रामीण धनंजय गावडे ,इंदापूरचे रघुनाथ गोपने, वालचंदनगर चे मोहन सूळ, सोमेश्वर चे सचिन म्हेत्रे व त्यांच्या उपविभागातील सर्व शाखा अभियंता, व जनमित्र यांनी ही धडक मोहीमेत भाग घेतला.
वीज कनेक्शन देण्यासाठी महावितरण तत्पर असून फक्त ओळखपत्र व जागेचा पुरावा या दोन कागदपत्रांवर नाममात्र रक्कम भरल्यावर कनेक्शन मिळेल. जागेचा पुरावा नसल्यास दोनशे रुपयांच्या शपथपत्रावर कनेक्शन दिले जाईल. त्यासाठी आपल्या स्थानिक शाखा कार्यालयात ग्राहकांनी संपर्क साधावा. व कोणत्याही परिस्थितीत वीज चोरी करू नये असे आवाहन बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता ,गणेश लटपटे यांनी केले