येशू ….. दया, दान आणि त्यागाचे मूर्तिमंत अस्तित्व.
चलातर मग प्रभूंना अपेक्षित ख्रिसमस साजरा करुया.
येशू ….. दया, दान आणि त्यागाचे मूर्तिमंत अस्तित्व.
चलातर मग प्रभूंना अपेक्षित ख्रिसमस साजरा करुया.
बारामती वार्तापत्र
ख्रिसमस म्हणजे प्रीती, शांती, आनंद आणि तारणाचा उत्सव, सर्व जगभर उत्साहात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या निमित्ताने मुलांना खेळणी, गोड खाऊ अशा भेटवस्तू दिल्या जातात, तसेच गोरगरीब उपेक्षितांना प्रीती भोजन व नवीन कपडे देऊन ख्रिसमस साजरा केला जातो, पण हे देणे म्हणजे नक्की काय ? तर प्रभू येशुंनी आपल्या पूर्ण आयुष्यात दया, प्रीती, करुणा आणि दान, व त्याग या गोष्टी शिकविल्या आहेत आणि नेमक्या त्याच करून, प्रभूला पुर्ण समर्पण देणे म्हणजेच ख्रिसमस होय, आणि याच प्रकारच्या शुभेच्छा देऊन ख्रिसमसचा आनंद द्विगुणीत केला जातो.
याचे उत्कृष्ठ उदाहरण, देवाने जगावर केलेली अगाध प्रीती आणि त्या प्रीतीस्तव आपल्या एकुलत्या एका पुत्राची दिलेली अनमोल भेट, ही.. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी प्रत्यक्षात घडली आहे. ती म्हणजे, कुमारी मरीयेच्या पोटी, प्रभू येशू जन्मास आले. कुमारी माता मरीयेशी, योसेफा सोबत वाग्दान
( साखरपुडा ) झाला होता. मात्र लग्न झाले नव्हते, त्या दरम्यान ईश्वराने मरीयेस, तुझ्यापोटी माझा एकुलता एक पुत्र जन्मास येणार असल्याची, देवदूता करवी भविष्यवाणी केली, आणि मरीयेने त्या ईश्वराच्या आज्ञेचे पालन केले. देवआज्ञेप्रमाणे प्रभू येशुंनी कुमारी मातेच्या पोटी जन्म घेतला.
बर… त्यागाचा प्रवास इथेच थांबला नाही, तर ईश्वरी पुत्राचा, योसेफाने देखील मोठ्या मनाने स्वीकार केला, आणि मरियेसोबत लग्न केले. आजच्या घडीला एखाद्या आपत्य असलेल्या विधवेशी कोणी लग्न करीत नाही, मात्र दोन हजार वर्षांपूर्वी माता मरीयेने आणि योसेफाने, ईश्वराप्रती असलेला त्याग आणि प्रेमाचे उदाहरण दाखल कृती करून दाखविली आहे.
माता मरियेच्या पोटात प्रभू येशू असताना, स्थानिक राजाच्या आदेशाने, येरूशलेम येथे माता मरिया आणि योसेफ हे दोघे जनगणनेसाठी गेले होते, मात्र त्याना येरूशलेम येथे गणना होईपर्यंत राहण्यास जागा मिळाली नाही. त्यामुळे दोघांना गायीच्या गोठ्यात राहावे लागले, त्यावेळी गोठ्यात असताना माता मरीयेला, प्रसवकळा आल्याने चक्क देवाला म्हणजेच, जगाच्या तारण हारला गायीच्या गोठ्यात जन्म घ्यावा लागला.
प्रभू येशुंचा जन्म झाल्या नंतर, प्रभूंनी देवाचा पुत्र असल्याचा कांगावा किंवा विनाकारणचा चमत्कार कधीच केला नाही, मात्र प्रभूंनी मानवी जन्मातील सर्व दु:ख, यातना, गरिबी तसेच सर्व सामान्य नागरिकांचे कर्म करीत राहिले. त्यांनी आपल्या परमेश्वर पित्याला मला असे जीवन का भोगण्यास भाग पाडल्याचा प्रश्न देखील विचारला नाही. उलट सामान्य जीवन जगत राहिले, तसेच आपल्या कृतीतून मानवी आईवडिलांना मदत करावे, त्यांचे मन जिंकणे, तसेच त्यांच्या आज्ञेत राहून सर्वसामान्य मानवी जीवन जगत राहिले. मग सुतार असलेल्या योसेफाला सुतारी कामात व माता मरीयेस घरातील कामात ते नेहमीच मदत करीत असत. यातून प्रभू येशू स्वतः ईश्वरी पुत्र असताना देखील, आपल्या परमपित्याच्या आज्ञेचे स्वतः आयुष्यभर पालन करीत राहिले.
प्रभूयेशु कुमार अवस्थेत असताना, येहुद्यांचा वल्हांडनाचा सन होता, त्या सना करिता सर्व कुटुंबासह प्रभू येरूशलेम येथे गेले होते, मात्र येशुंची उत्सवानंतर, त्यांची व त्यांच्या माता पित्यांची चुकामूक झाली आणि त्या दरम्यान प्रभू अचनक ईश्वराच्या मंदिरात गेले, तेथे त्यांना शास्त्री, परुशी, याजक ( धर्मगुरु ) यांचा काही स्वार्थी कारणाने वाद विवाद सुरु असल्याचे निदर्शनास आले, ते पाहून, येशू त्यांच्या जवळ गेले, आणि देवा विषयीच्या, अनेक न सुटणाऱ्या मात्र देवाला अवश्यक असलेल्या धार्मिक चर्चा करू लागले, त्या घटनेने उपस्थित धर्मगुरू आश्चर्यचकीत झाले, आणि येशुंचे कौतुक करू लागले, की.. एवढ्याश्या दहा – बारा वर्षांच्या कुमाराला, धर्माचे आणि देवाचे एवढे ज्ञान कसे काय ? असा प्रश्न उपस्थित करू लागले. मात्र प्रभू शांत आणि संयमाने स्मित हास्य करीत म्हणाले, निस्वार्थी ईश्वराची सेवा हेच ईश्वराच्या प्रिय सेवकाचे कर्म असते, त्याला कुठल्याही स्वार्थाचा गंध नसावा, असे म्हतात. तेवढ्यात त्यांना शोधत – शोधत, माता मरिया व पिता योसेफ तेथे आले, आणि येशुंना विचारले बाळा तु इथे काय करतोयस ? तेव्हा येशू आपल्या निरागस मनाने पुन्हा स्मित हास्य करीत म्हणाले की, “ मी माझ्या पित्याच्या घरात असणे, हे योग्य नाही काय ?
सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकजण आपल्या स्वार्थी हेतूने, ईश्वराच्या दाराची पायरी चढताना दिसत आहे. तसेच, मंदिरात देवाच्या वचनाची आणि त्याच्या गुण गौरवाची चर्चा करण्यापेक्षा, स्वतःच्या फायद्याची आणि गौरवाची चर्चा करताना दिसत आहेत.
शेवटी एवढेच सांगेन की, आयुष्याचा मार्गक्रम करीत असताना, प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावी लागतात, त्यातून ईश्वरी पुत्र येशू देखील सुटले नाहीत, आपल्या पूर्ण जीवनात येशुंना, अनेक परीक्षांना आणि आव्हानांना, तसेच अवहेलनेला सामोरे जावे लागले आहे. त्यांनी मानवी जीवनातील सर्व दु:ख, यातना, स्वतः सहन केल्या, तसेच सद्ग्रह्स्ताला सदमार्ग दाखविला, शिवाय पापी माणसाचे पाप आपल्या शिरावर घेतले, एवढा मोठा त्याग ईश्वरी पुत्रा शिवाय शक्य नाही.
प्रभू येशुंनी दया, दान व त्याग या तीन गोष्टी आपल्या कृतीतून केल्या आणि आपल्या अनुयायांना त्याच शिकविल्या, नेमक्या त्याच करून, प्रभूला पूर्ण समर्पण देणे म्हणजेच ख्रिसमस होय, चलातर मग प्रभूंना अपेक्षित ख्रिसमस साजरा करुया.