शैक्षणिक धोरणांची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते याच्यावर भविष्यातील भारतीय शिक्षणप्रणाली चे यश व अपयश अवलंबून -रणजितसिंह डिसले
इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना केले मत व्यक्त
शैक्षणिक धोरणांची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते याच्यावर भविष्यातील भारतीय शिक्षणप्रणाली चे यश व अपयश अवलंबून -रणजितसिंह डिसले
इंदापूर येथे पत्रकारांशी बोलताना केले मत व्यक्त
इंदापूर:सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
शैक्षणिक धोरणांची कशा पद्धतीने अंमलबजावणी होते आणि त्याची भूमिगत पातळीवर कशा पद्धतीने अंमलबजावणी होईल याच्यावरच भविष्यातील भारतीय शिक्षण प्रणालीचे यश व अपयश अवलंबून आहे.असे मत ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी इंदापूरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांचे सांत्वन करण्यासाठी ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले हे भरणेवाडी येथे आले होते.इंदापूरमधून परितेवाडी गावी परतत असताना शहरातील पुणे-सोलापूर बाह्यवळण रस्त्यालगत असणार्या देशपांडे व्हेज या ठिकाणी आले असता पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला.
त्यावेळी पत्रकारांनी आधुनिक शिक्षण पद्धती बद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना डिसले गुरुजी म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी बदल होणे अपेक्षित दिसत असून त्याच वेळी पाठ्यपुस्तके किंवा अभ्यासक्रम 21 व्या शतकातील गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आला तर खूप सारे अमुलाग्र बदल होऊ शकतील. नवे येऊ घातलेले शैक्षणिक धोरण भविष्यातील बदलांचा वेध घेणारे धोरण आहे. सरकार व इतर संस्था कशी अंमलबजावणी करतात हे पण तितकेच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितले.
कोरोनाबद्दल बोलताना रणजितसिंह डिसले म्हणाले की, मनामध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा आणि योग्यवेळी निदान करून उपचारांना जलद प्रारंभ केल्यास कोरोनावर मात करता येऊ शकते.कोरोनाला घाबरण्याचे काहीही कारण नाही.कोरोना मात करण्याजोगाच आजार आहे.ऐंशी वर्षाचे वृद्ध देखील त्यावर मात करू शकतात.योग्य वेळी योग्य उपचार होणे आवश्यक आहे.